बलाढय़ मुंबईला नमवून पुण्याने साधली हॅट्ट्रिक
आंतरराष्ट्रीय कीर्तीची कबड्डीपटू दीपिका जोसेफच्या चतुरस्र खेळामुळे पुणेरी यश झळाळून निघाले. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढय़ मुंबई शहरचे आव्हान ३०-१६ अशा फरकाने सहज नामशेष करीत पुण्याने प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी करंडकावर सलग तिसऱ्यांदा नाव कोरले. याशिवाय सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि दुबईवारीसुद्धा पुण्याच्या खात्यावर जमा झाली.
पुण्याच्या स्नेहल शिंदेची पकड करीत स्नेहल साळुंखेने मुंबईला पहिला गुण मिळवून दिला. त्यानंतर दीपिकाने पहिला गुण घेत बरोबरी साधली. मग दीपिकाने आपला गुण घेण्याचा सपाटा चालूच ठेवला. त्यापुढे मुंबईचे क्षेत्ररक्षण निष्प्रभ जाणवले. गौरी वाडेकर, आरती नार्वेकर, सुवर्णा बारटक्के यांना चढायांमध्ये दमदार यश मिळाले नाही. दीपिकाने पुण्यासाठी दीपस्तंभासारखी अष्टपैलू कामगिरी करताना १५ चढायांमध्ये ७ गुण कमवले आणि दोन उत्तम पकडीसुद्धा केल्या. पुण्याची उजवी कोपरारक्षक ईश्वरी कोंडाळकरने ७ अप्रतिम पकडी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांची ज्यु. स्नेहल शिंदे फारसा प्रभाव पाडू शकली नाही. मुंबईकरांनी तिची चार वेळा पकड केली. मुंबईकडून गौरी वाडेकरने ६ चढायांमध्ये ४ गुण मिळवले, तर सुवर्णाला फक्त एकच गुण मिळविता आला. दरम्यान, तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत पुरुषांमध्ये रत्नागिरीने मुंबई शहरचा २९-२४ अशा फरकाने पराभव केला, तर महिलांमध्ये ठाणे संघाने रत्नागिरीला ४५-१३ असे हरवले.
पारितोषिक वितरण समारंभासमयी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, क्रीडा व युवक मंत्री पद्माकर वळवी, पालकमंत्री व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, खासदार जयवंतराव आवळे तसेच कोल्हापूरच्या महापौर जयश्री सोनवणे उपस्थित होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2013 रोजी प्रकाशित
पुणे, मुंबई उपनगर लय भारी, घडणार त्यांना दुबईवारी!
बलाढय़ मुंबईला नमवून पुण्याने साधली हॅट्ट्रिकआंतरराष्ट्रीय कीर्तीची कबड्डीपटू दीपिका जोसेफच्या चतुरस्र खेळामुळे पुणेरी यश झळाळून निघाले. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या बलाढय़ मुंबई शहरचे आव्हान ३०-१६ अशा फरकाने सहज नामशेष करीत पुण्याने प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी करंडकावर सलग तिसऱ्यांदा नाव कोरले. …

First published on: 10-03-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune kabaddi team won shivaji maharaj kabaddi cup