India vs Pakistan, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना. दोन्ही फक्त आशिया चषक आणि आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने येत असतात. दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहते आवर्जून हा सामना पाहतात.

मात्र पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. आम्ही भारत -पाकिस्तान सामना पाहणार नाही, असं अनेक क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे. पण भारत सरकारने या सामन्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे सामना होणार यात काहीच शंका नाही. या सामन्याआधी आयपीएल फ्रँचायझीने या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. आता पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रँचायझीने देखील पोस्ट शेअर करत या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.

दरवेळी जेव्हा भारत – पाकिस्तान सामना होतो तेव्हा क्रिकेट चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पण यावेळी असं काहीच पाहायला मिळालेलं नाही. या सामन्याआधी पंजाब किंग्ज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारत – पाकिस्तान सामन्याची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवचा फोटो होता. पण विरुद्ध संघ असलेल्या पाकिस्तानचा फोटो नव्हता. हा बॉक्स रिकामा ठेवण्यात आला होता.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील फ्रँचायजी कराची किंग्ज संघाकडून एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर बुद्धिबळ थीम असलेले ग्राफिक शेअर केले आहे. ज्यात एका बाजूला पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली बुद्धिबळ खेळत असल्याचं दिसून येत आहे. परंतु भारतीय संघाच्या कर्णधाराचा फोटो लावण्यात आलेला नाही. ही कृती पंजाब किंग्ज संघाने केलेल्या पोस्टची नक्कल असल्याचं म्हटलं जात आहे. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.