पी. व्ही. सिंधू, सायली गोखले, पी. सी. तुलसी यांनी मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. चीन सुपर सीरिज स्पर्धेत सलामीच्या लढतीतच सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या स्पर्धेत सिंधूने संघर्षपूर्ण विजयासह सुरुवात केली.
अव्वल मानांकित सिंधूने कोरियाच्या सो जिन किमवर १५-२१, २१-१२, २१-९ असा विजय मिळवला. सो हिने पहिला गेम जिंकत सिंधूवर दडपण आणले. पहिल्या गेममध्ये सिंधूच्या हातून बऱ्याच चुका झाल्या. दुसऱ्या गेममध्ये जोरदार रॅली तसेच नेटजवळून सुरेख खेळ करत सिंधूने बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूच्या दमदार स्मॅशच्या जोरावर सोला निष्प्रभ ठरवले आणि सामना जिंकला. पुणेकर सायली गोखलेने तैपेईच्या चि या चेंगवर २४-२२, २१-१५ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये झालेल्या चुरशीच्या मुकाबल्यात सायलीने चिकाटीने खेळ करत बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये शैलीदार फटके आणि नेटजवळच्या चांगल्या खेळाच्या जोरावर सायलीने विजय साकारला. पी. सी. तुलसीने थायलंडच्या द्वितीय मानांकित निचाऑन जिंदापॉनला २२-२०, २१-१९ असे नमवले.
पुरुषांमध्ये तैपईच्या जेन हाओ ह्स्युने सौरभ वर्माचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला. हाँगकाँगच्या चुन हेई तामने एच. एस. प्रणॉयवर २१-१३, २१-१८ असा विजय मिळवला. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्याने तैपेईच्या पेई राँग वांग आणि कुओ युन वेन जोडीला विजयी घोषित करण्यात आले. थायलंडच्या निप्तिथॉन पुनगुपअच-पुटिटा सुपारीजीकल जोडीने अश्विनी पोनप्पा-तरुण कोना जोडीवर २१-१०, १७-२१, २१-१३ अशी मात केली.