दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने गुरुवारी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या चीनच्या वांग झी यी वर २१-१९, २१-१५ असा विजय मिळवत ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

बासेलमध्ये २०१९ ला जागतिक जेतेपद मिळवणाऱ्या १५व्या मानांकित सिंधूला उपउपांत्यपूर्व विजय मिळवण्यास ४८ मिनिटांचा वेळ लागला. सिंधूसमोर आता उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या पुत्री कुसुमा वर्दानचे आव्हान असेल. इंडोनेशियाच्या खेळाडूने या वर्षाच्या सुरुवातीला सुदीरमन चषक स्पर्धेत सिंधूला सरळ गेममध्ये नमविले होते.

सिंधूने सामन्याला चांगली सुरुवात केली. वेगवान स्मॅश आणि नेटजवळील खेळाच्या जोरावर सिंधूने गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली. मात्र, गेमच्या दुसऱ्या टप्प्यात वांगने खेळ उंचावत गेम १९-१९ असा बरोबरीत आणला. मात्र, सिंधूने संयमाने खेळ करीत पहिला गेम जिंकत आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने दबाव कायम राखताना मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी मिळवली. यानंतर ५७ फटक्यांच्या रॅलीत तिचा कस लागला. मात्र, सिंधूने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला व सामन्यात विजय नोंदवला. सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी, वांग यिहान (२०१३), वांग शिक्सियन (२०१४), ली शुरुई (२०१५), सुन यू (२०१७) आणि चेन युफेई (२०१७ आणि २०१९) या चीनच्या खेळाडूंना पराभूत केले होते. ‘‘वांग झी ही चांगली खेळाडू आहे. पण, माझा प्रयत्न केवळ चांगला खेळ करण्यावर होता. मी आघाडीवर असतानाही तिने आव्हान उपस्थित केले. तिच्याविरुद्ध खेळण्यासाठी मी सज्ज होते. मी सध्या एकावेळेला एकाच सामन्याचा विचार करीत आहे. मी पुढील फेरीत आणखी चांगला खेळ करण्याच्या तयारीने उतरेन,’’ असे सिंधू म्हणाली.

भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने हाँगकाँगच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या तांग चुन मान व त्से यिंग सुएट जोडीला ६३ मिनिटे चाललेल्या सामन्यात १९-२१, २१-१२, २१-१५ असे नमविले. पहिल्या गेम गमावल्यानंतरही भारतीय जोडीने आपला खेळ उंचावत आशियाई विजेत्या जोडीला पराभूत केले.

मला काहीच सिद्ध करायचे नाही. मात्र, खेळात नेहमीच चढ-उतार येतात. दुखापतींचाही सामना करावा लागतो. सामन्यात उतरल्यावर निकालाचा विचार न करता आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला मला प्रशिक्षकांनी दिला होता. त्यामुळे ही कामगिरी मी करू शकले. – पी.व्ही. सिंधू