स्पर्धेतली सातत्यपूर्ण कामगिरी अंतिम लढतीतही कायम राखत पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. या स्पर्धेचे सिंधूचे हे दुसरे जेतेपद आहे.
याआधी २०१३ मध्ये सिंधूने या स्पर्धेत जेतेपदाची कमाई केली होती. गेल्या वर्षी दुखापतीमुळे लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकलेल्या सिंधूने नव्या वर्षांची सुरुवात जेतेपदाने केली आहे. सिंधूच्या कारकीर्दीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे हे पाचवे जेतेपद आहे.
अंतिम लढतीत सिंधूने क्रिस्ती गिलमूरवर २१-१५, २१-९ असा विजय मिळवला. तृतीय मानांकित सिंधूने झटपट विजय मिळवत २०१३ मध्ये क्रिस्तीविरुद्धच्या पराभवाची परतफेड केली. प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या सिंधूने तोच फॉर्म कायम राखत बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सिंधूने ५-२ अशी आघाडी घेतली. अचूक सव्र्हिसच्या बळावर सिंधूने क्रिस्तीला चुका करण्यास भाग पाडले आणि १२-६ अशी आघाडी मिळवली. क्रिस्तीने सलग गुण मिळवत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंधूने आघाडी वाढवत सरशी साधली. दुसऱ्या गेममध्ये तडाखेबंद स्मॅशेस आणि नेटजवळून सुरेख खेळ करत क्रिस्तीला तिने निष्प्रभ केले.
पाच लाखांचे बक्षीस
नवी दिल्ली : मलेशिया मास्टर्स स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भारतीय बॅडमिंटन संघटनेने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘‘दिमाखदार जेतेपदासाठी सिंधूचे अभिनंदन. २०१३ मध्ये सिंधूने ही स्पर्धा जिंकली होती आणि यंदाही तिने बाजी मारली. तिचा अभिमान वाटतो,’’ असे मत व्यक्त करून संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी पुढील वाटचालीसाठी सिंधूला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाला, ‘‘ ऑलिम्पिकच्या तोंडावर मिळवलेला हा विजय सिंधूसाठी प्रेरणादायी ठरेल.’’
हा शानदार विजय आहे. नव्या हंगामाची सकारात्मक सुरुवात झाली आहे. मी चांगली खेळत आहे. उपांत्य फेरीची लढत अटीतटीची झाली. त्या विजयामुळेच आत्मविश्वास दुणावला. अंतिम लढतीत सहज विजय मिळेल असे वाटले नव्हते. २०१३च्या तुलनेत माझा खेळ बदलला आहे. आघाडी मिळाल्यानंतरही स्थिर राहत मी जिद्दीने खेळ केला. या विजयातून प्रेरणा घेत सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी आतुर आहे.
– पी.व्ही.सिंधू, मलेशिया स्पर्धा विजेती