R Ashwin On Cheteshwar Pujara: भारतीय संघाला गेल्या काही महिन्यात अनेक मोठे धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आर अश्विनने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत निवृत्त होत असल्याची बातमी दिली. या तिन्ही दिग्गज खेळाडूंनी कसोटी संघाची साथ सोडल्यानंतर आता संघातील सर्वात विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पुजाराच्या या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान आता आर अश्विनने पुजाराच्या निवृत्तीनंतर मोठं वक्तव्य केलं आहे.
चेतेश्वर पुजाराला २०१० मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे खेळाडू या संघाचा भाग होते. या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर पुजाराला भारतीय संघात स्थान मिळालं. त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना भारताची भिंत म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याच्याकडे राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. त्याने ही जबाबदारी ओळखली आणि अनेकदा संघासाठी मैदानात टिचून उभा राहिला. पण त्याने दिलेल्या योगदानाकडे अनेकदा दुर्लक्षित केलं गेलं होतं, असं आर अश्विनचं म्हणणं आहे.
काय म्हणाला आर अश्विन?
चेतेश्वर पुजाराबद्दल बोलताना आर अश्विन म्हणाला, “चेतेश्वर पुजाराने भारतीय क्रिकेटमध्ये किती योगदान दिलं? माझ्या मते, त्याने दिलेलं योगदान हे विराट आणि रोहितपेक्षा कमी नव्हतं. बरेच लोकं त्याच्या योगदानाबद्दल बोलतात. प्रत्येक क्रिकेटपटू लक्ष वेधून घेईल, असं नसतं. पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, त्याचं संघासाठी दिलेलं योगदान कमी आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण तिसऱ्या क्रमांकावर पुजाराने जी कामगिरी केली त्यामुळेच विराटला धावा करण्यात मदत झाली.”
आर अश्विनने पुजाराची तुलना गेम ऑफ थ्रोन्समधील प्रसिद्ध पात्रासोबत केली आहे. अश्विनने पुजाराला भारतीय संघाचा व्हाईट वॉकर असे संबोधले आहे. अश्विन म्हणाला, “तुम्ही जर गेम ऑफ थ्रोन्स पाहिलं असेल, तर तुम्हाला व्हाईट वॉकर नावाचं पात्र माहित असेल. मी पुजाराला व्हाईट वॉकर म्हणतो, कारण तो हळूहळू चालतो पण कधीच मैदान सोडून जात नाही.”