अभिनेता आर माधवन सध्या आपल्या ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांनी आणि चित्रपट समीक्षकांनी कौतुक केले आहे. असे असूनही माधवनला स्वत:चे नाही तर मुलाचे कौतुक आहे. त्याचा मुलगा वेदांतने ज्युनियर नॅशनल अ‍ॅक्वाटिक्समध्ये कनिष्ठ गटात १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. माधवनने ट्वीट करून आपल्या मुलाचे कौतुक केले आहे.

आर माधवनने ‘अ‍ॅक्वाटिक मीट’मधील वेदांतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वेदांत राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी पोहताना दिसत आहे. “नेव्हर से नेव्हर. १५०० मीटर फ्रीस्टाइलचा राष्ट्रीय ज्युनियर विक्रम मोडला,” अशा कॅप्शनसह त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर माधवनचा मुलगा वेदांत हा एक व्यावसायिक जलतरणपटू आहे. त्याने एप्रिल महिन्यात कोपनहेगनमधील ‘डॅनिश ओपन २०२२’ या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. त्याने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आर माधवनचे कौतुक केले होते.

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत यांचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वीच वेदांतच्या ऑलिंपिक प्रशिक्षणासाठी माधवनचे कुटुंब दुबईला स्थायिक झाले आहे.