एपी, मेलबर्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारांकित टेनिसपटू राफेल नदालने दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुखापतीमुळे त्याला १२ महिने खेळापासून दूर रहावे लागले आणि पुनरागमनाच्या स्पर्धेतच त्याला दुखापतीचा त्रास जाणवू लागला.

ब्रिस्बन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या तिसऱ्या सेटमध्ये नदालला वैद्यकीय साहाय्यता घ्यावी लागली होती. या सामन्यात त्याला जॉर्डन थॉम्पसनने पराभूत केले होते. २२ ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणाऱ्या नदालला गेल्या वर्षी दुखापतीचा सामना करावा लागला होता. मेलबर्नवरून आल्यानंतर ‘स्कॅन’च्या माध्यमातून स्नायूंना दुखापत झाल्याची बाब समोर आली व उपचारांसाठी पुन्हा स्पेनमध्ये नदाल जाणार आहे. ‘‘मी सध्या उच्च स्तरावरील पाच सेटच्या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तयार नाही. मी पुनरागमन करण्यासाठी वर्षभर खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे माझ्यासाठी दुख:द बातमी आहे. त्यामुळे मेलबर्नच्या चाहत्यांसमोर मला खेळता येणार नाही. या सत्रात खेळण्याबाबत मात्र मी सकारात्मक आहे.’’ असे नदालने ‘एक्स’वर सांगितले.

हेही वाचा >>>IND vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित-विराटसह ‘या’ खेळाडूचे पुनरागमन

नदालने ब्रिस्बन स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवले. यामध्ये त्याने डॉमिनिक थिएम व ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलरला पराभूत केले. उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये नदालला तीन ‘मॅच पॉइंट’ मिळाले. मात्र, नदालने ते तिन्ही ‘पॉइंट’ गमावले. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा १४ जानेवारीपासून मेलबर्न पार्क येथे सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal withdraws from australian open tennis tournament due to injury amy
First published on: 08-01-2024 at 01:45 IST