श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी येथील खेळपट्टीशी समरस होण्याकरिता आयोजित तीन दिवसीय सराव सामन्यात भारताने अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी ६ बाद ३१४ धावांची मजल मारली. श्रीलंका अध्यक्ष एकादश संघाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी रहाणेने भारताचा डाव सावरला असला तरी कर्णधार विराट कोहली अजुनही खराब कामगिरीशी झगडताना पहायला मिळाला.
श्रीलंका अध्यक्ष एकादश संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्यांचा प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी भारताला १०८ धावांची मजबूत सलामी दिली. मात्र, त्यांच्या माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा (७) आणि विराट कोहली (८) स्वस्तात बाद झाल्याने भारताचा डाव डगमगला. ४ बाद १३३ धावांवरून रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनी १३४ धावांची भागिदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनीही श्रीलंका अध्यक्ष एकादश संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेताना धावांचा डोंगर उभा केला.
४२ धावांवर पुजारा माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला वृद्धिमान सहाही (३) लगेच बाद झाला. मात्र, रहाणेने एका बाजूने खिंड लढवताना धावगती वाढवत ठेवली. दिवसअखेर भारताने सहा बाद ३१४ धावांपर्यंत मजल मारली आहे. रहाणेने १२७ चेंडूंत ११ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १०९ धावा चोपल्या. रविचंद्रन अश्विन १० धावांवर खेळत आहे. प्रतिस्पर्धी संघाकडून कसून राजिथाने सर्वाधिक ३ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ६ बाद ३१४ (लोकश राहुल ४३, शिखर धवन ६२, अजिंक्य रहाणे नाबाद १०९, चेतेश्वर पुजारा ४२; कसून राजिथा ३/४७, जेफरी व्हँडेर्साय २/७६)विरुद्ध श्रीलंका अध्यक्ष एकादश.