scorecardresearch

सर्वांना विस्मयचकित करत राहुल द्रविडने आईच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावली हजेरी

राहुल द्रविडच्या आईच्या जीवनप्रवासवर आधारित पुस्तक प्रदर्शन सोहळ्यासाठी पुण्यात हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे होते.

सर्वांना विस्मयचकित करत राहुल द्रविडने आईच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावली हजेरी
सौजन्य- पुणे विभाग

पुण्याच्या गार हवेतील रमणीय वातावरणात छान निसर्गरम्य अशा भांडारकर रस्त्यावरील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात ‘कॅनव्हास ते वॉल’ पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. डॉ. पुष्पा द्रविड यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कॅनव्हास ते वॉल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने हजेरी लावली. त्याला पाहून त्याच्या आईसह तेथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

डॉ. पुष्पा द्रविड यांच्यावर आधारित ‘कॅनव्हास ते वॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन व ई-बुकचे अनावरणाच्या निमित्ताने सर्वांनी उपस्थिती लावली होती. हे पुस्तक भारताची ‘द वॉल’ राहुल द्रविडची आई डॉ. पुष्पा द्रविड यांच्या कारकीर्दीवर आधारित होत. मात्र तरीदेखील या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठेही राहुल द्रविड कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे माहिती देण्यात आली नव्हती. कारण सध्या तो टीम इंडियाचा प्रशिक्षक असल्याने त्याला वेळ नाही असे खुद्द डॉ. पुष्पा द्रविड यांनी सांगितले होते. पण तो अचानक येऊन पुढ्यात उभा राहिला आणि त्याला पाहताच त्याच्या आईला खूप आनंद झाला. त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते. तो येणार आहे याची अजिबात तिला कल्पना नव्हती असे तिने सांगितले.

हेही वाचा :   IND vs PAK: “वर्ल्डकपवर बहिष्कार…” माजी पाकिस्तानी क्रिकेटरने रमीज राजाच्या धमकीची उडवली खिल्ली

द्रविडची उपस्थिती पाहताच तो आपल्या आईच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे आणि मुलगा येणार नाही, असे होणे अशक्यच होते असे तेथे उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षक यांनी कौतुक केले. शुक्रवारी सायंकाळी बरोबर ६ वाजता राहुल द्रविड अचानक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात आला. अगदी सध्या वेशभूषेत अंगात निळ्या रंगाचा असलेला शर्ट आणि निळी पॅन्ट अशा कपड्यांमध्ये तो आला. जागतिक कीर्ती लाभली असली, तरी तो मी सेलिब्रेटी नाही, या अविर्भावातच वावरत होता. तो बंगळूरचा जरी असला तरी तो अस्खलित मराठी बोलतो. त्याने सर्वांशी मराठीत गप्पा मारल्या.

टीम इंडियाचा प्रशिक्षक द्रविड पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर प्रचंड गर्दी झाली असती, म्हणून निमंत्रण पत्रिकेत नाव देण्याचे टाळले अशीही माहिती समोर आली आहे. कारण या कार्यक्रमाला आईच्या आयुष्यावर आधारित पुस्तक लिखित स्वरूपात समोर येणार होते. त्यात द वॉलची कशाला येईल एवढ्या छोट्याश्या कार्यक्रमाला? अशीच कदाचित राहुलसोबत सर्वाची अपेक्षा असावी. म्हणूनच त्याने कोणालाही काहीही तिळमात्र शंकाही येऊ न देता या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पुस्तक प्रकाशनालाही व्यासपीठावर न बसता समोरील रांगेत बसून आईच्या कर्तृत्वाचा सोहळा तो अनुभवत होता. त्याच्या डोळ्यात आईविषयीचे प्रेम, वात्सल्य, कौतुक या सर्व प्रकारच्या भावना जाणवत होत्या.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: ‘एमबाप्पे हा एक उत्कृष्ट खेळाडू’, प्रशिक्षक डेशॅम्प्स यांनी डेन्मार्कच्या सामन्यानंतर केला कौतुकाचा वर्षाव

कार्यक्रमात बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, “ हातात घेतलेल्या कोणतेही काम मग ते लहान असो वा मोठे महत्वाचे असो वा कमी महत्वाचे त्यावर एकाग्रचित्ताने टिकून राहायचं, ते असच सोडून द्यायचं नाही, हेच मी माझ्या आईकडून शिकलो. तिच्यातलं धैर्य, शांत वृत्ती आणि संयम, कोणतीही गोष्ट धीराने घ्यायची ही गोष्ट शिकलो.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 15:37 IST

संबंधित बातम्या