भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लेकही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. अन्वय द्रविडही वडिलांप्रमाणेच फलंदाज आहे आणि याचबरोबर तो यष्टीरक्षक देखील आहे. यासह द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविडदेखील फलंदाज आहे. यादरम्यान राहुल द्रविडचा मुलगा अन्वय याची भारतीय संघात निवड झाली आहे.
द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय आता भारतीय संघात खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तान ज्युनियर संघाबरोबर तिरंगी मालिका खेळणार आहे. ही तिरंगी मालिका खेळण्यासाठी बीसीसीआय भारताचे दोन अंडर-१९ संघ मैदानात उतरवले जाणार आहेत. यासाठी संघ अ आणि ब जाहीर करण्यात आले आहेत.
अन्वय द्रविडला ब संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळण्याची संधी देण्यात आली आहे. सर्वांच्या नजरा द्रविड ज्युनियरवर असणार आहेत. कर्नाटक अंडर-१९ संघामधील त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे अन्वय द्रविडला संघात संधी मिळाली आहे. आता, भारतीय संघात त्याचा समावेश झाल्यामुळे अन्वयच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत. या तिरंगी मालिकेतील दमदार कामगिरीमुळे अन्वयला भारताच्या मुख्य अंडर-१९ संघात स्थान मिळू शकते.
भारतीय संघ सध्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी तयारी करत आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे उच्च पातळीवर खेळत आहेत, म्हणूनच ते या तिरंगी मालिकेसाठी संघाचा भाग नसतील.
भारताच्या अंडर-१९ संघांचे दोन्ही स्क्वॉड
भारत अंडर-१९ अ संघ
विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), वाफी कच्छी, वंश आचार्य, विनीत व्हीके, लक्ष्य रायचंदानी, ए. रापोल (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, अनमोलजीत सिंग, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, आशुतोष महिदा, आदित्य रावत, मोहम्मद मलिक
भारत अंडर-१९ ब संघ
आरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी (उपकर्णधार), युवराज गोहिल, मौल्यराज सिंग चावडा, राहुल कुमार, हरवंश सिंग (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेसन जे, उद्धव मोहन, इशान सूद, डी दीपेश, रोहित कुमार दास
भारत अंडर-१९ अ संघ, ब संघ आणि अफगाणिस्तान अंडर-१९ तिरंगी मालिकेचं वेळापत्रक
१९ नोव्हेंबर २०२५ – भारत अंडर-१९ ब वि. अफगाणिस्तान अंडर-१९
२१ नोव्हेंबर २०२५ – भारत अंडर-१९ अ वि. अफगाणिस्तान अंडर-१९
२३ नोव्हेंबर २०२५ – भारत अंडर-१९ अ वि. भारत अंडर-१९ ब
२५ नोव्हेंबर २०२५ – भारत अंडर-१९ ब वि. अफगाणिस्तान अंडर-१९
२७ नोव्हेंबर २०२५ – भारत अंडर-१९ अ वि. अफगाणिस्तान अंडर-१९
३० नोव्हेंबर २०२५ – फायनल
