महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरणाऱ्या देना बँकेने बलाढय़ रेल्वे पोलिसांना चांगलेच झुंजविले. परंतु तरीही आपल्या दर्जाला साजेसा खेळ करीत रेल्वे पोलिसांनी १८-९ अशा फरकाने विजयी सलामीची नोंद केली. बोचणाऱ्या थंडीची तमा न बाळगता पांचगणी व्यायाम मंडळातर्फे पांचगणीतील भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेला क्रीडारसिकांनी उत्साहाने दाद दिली. रेल्वे पोलिसांच्या सुरेंद्र थोरवेने दमदार चढाया केल्या.
रेल्वे पोलिसांच्या थोरवेने पहिल्याच चढाईत दोन गुण घेत संघाचे खाते उघडले, त्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला रेल्वेने देना बँकेवर पहिला लोण चढविला. त्यावेळी हा सामना एकतर्फी होणार अशी अपेक्षा होती. परंतु युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या देना बँकेने जिद्दीने दिलेली झुंज वाखाणण्योजोगी होती. मध्यंतराला रेल्वे पोलिसांकडे ११-५ अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही रेल्वे पोलिसांने सामन्यावरील नियंत्रण कायम राखले. देना बँकेकडून सनीला जाधव आणि संजय राणे यांनी चांगल्या चढाया केल्या. स्पध्रेच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र राजपुरे, तानाजी भिलारे, फिरोझ पठाण, अजित कासुर्डे, गॅब्रिएल फर्नाडिस आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकृष्ण क्रीडा मंडळाला विजेतेपद
साताऱ्याच्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने पांचगणीच्या हनुमान मंडळाचा २६-२३ असा फक्त ३ गुणांनी पराभव करून जिल्हास्तरीय ३५ किग्रॅ वजनी गटाचे विजेतेपद प्राप्त केले. मध्यंतराला श्रीकृष्ण संघाकडे ९-७ अशी दोन गुणांची आघाडी होती. श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या आर्या आवाळेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित क्रीडारसिकांची मने जिंकली. पराभूत संघाकडून विकास शिंदे आणि आकाश शिंदे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.