युवा सलामीवीर शुभमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नाबाद ४० धावा केल्या.गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत खूप प्रभावित केले आहे. संधी मिळाल्यावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. अशात पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

रमीझ यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “शुबमन गिल मिनी रोहित शर्मा वाटतो. त्याच्याकडे अतिरिक्त वेळ असून तो चांगली फलंदाजी करतो. त्याच्याकडे पुरेशी क्षमता आहे. आक्रमकता देखील काळाबरोबर येईल. गिलला त्याच्या खेळात काहीही बदल करण्याची गरज नाही. नुकतेच त्याने द्विशतक झळकावले आहे.”

रमीझ राजाने रोहितचे कौतुक करताना सांगितले की, तो हुक आणि पुल शॉटचा उत्कृष्ट स्ट्रायकर आहे. दुसऱ्या वनडेमध्ये रोहितने न्यूझीलंडविरुद्ध ५१ धावांची इनिंग खेळली. रमीझ राजा म्हणाले, “भारतासाठी दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करणे सोपे होते. कारण त्यांच्याकडे रोहितसारखा महान फलंदाज आहे. तो खूप छान खेळतो. तो हुक आणि पुल शॉट्ससह अप्रतिम स्ट्रायकर आहे. अशा स्थितीत १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे जाते.”

हेही वाचा – IND vs NZ ODI: टीम इंडियाच्या ‘या’ स्टाईलने रमीझ राजा प्रभावित; म्हणाले, ‘पाकिस्तानसह इतर संघांनीही…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले की, वनडे आणि कसोटीत पुन्हा भारताचा दबदबा निर्माण करण्यामागे गोलंदाजी हेच प्रमुख कारण आहे. रमीझ म्हणाले, “वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे पुनरागमन गोलंदाजीच्या आधारावर झाले आहे, कारण त्यांची फलंदाजी ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आहे.” न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.