प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या साथीतून देश सावरत असताना देशांतर्गत क्रिकेट हंगाम कसा असावा, ही चर्चा आता ऐरणीवर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या पर्यायांबाबत अभिप्राय देताना संलग्न राज्य संघटनांनी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा यांचा स्मावेश असलेल्या चौथ्या पर्यायाला प्राधान्य दिले आहे. ‘बीसीसीआय’ने या पर्यायाला मंजुरी दिल्यास रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेलाच यंदा काट मारली जाऊ शकते. परंतु क्रिकेटमधील जाणकारांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आगामी आव्हानांचा विचार करता रणजी करंडक आणि मुश्ताक अली स्पर्धेचा समावेश असलेला तिसरा पर्यायच उपयुक्त ठरेल.

भारतीय भूमीवर अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सुरू झालेला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ झाला आहे. क्रिकेटपटूंना करोनाची बाधा झाल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. पण तरीही जैव-सुरक्षित वातावरणात सामने खेळले जात आहेत. भारताने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संयुक्त अरब अमिरातीत यशस्वी केली. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला फेब्रुवारीपासून इंग्लंडशी संपूर्ण मालिका खेळायची आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ६७ दिवसांच्या रणजी करंडक स्पर्धेला वजा करणे चुकीचे ठरेल. देशात सहा जैव-सुरक्षित केंद्रांची निर्मिती करून क्रिकेट हंगाम राबवण्याचे ‘बीसीसीआय’चे धोरण आहे. ‘आयपीएल’मध्ये दोन संघ वाढणार असल्याने मुश्ताक अली स्पर्धाही आवश्यक ठरते. याचप्रमाणे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या तुलनेत रणजी स्पर्धेद्वारे खेळाडूंना चांगले मानधन मिळते. आर्थिक चणचणीच्या कालखंडात हे उत्पन्न क्रिकेटपटूंना मोलाचे ठरू शकेल.

‘बीसीसीआय’चे पर्याय

१. फक्त रणजी करंडक स्पर्धा (६७ दिवस)

२. फक्त सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा (२२ दिवस)

३. रणजी करंडक (६७ दिवस) आणि मुश्ताक अली स्पर्धा (२२ दिवस)

४. मुश्ताक अली (२२ दिवस) आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा (२८ दिवस)

रणजीला वगळणे चुकीचे ठरेल!

*  दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

देशांतर्गत क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या भवितव्याचा विचार केल्यास दीर्घकालीन स्वरूपाचे रणजी करंडक, इराणी करंडक, दुलीप करंडक यांना मी महत्त्व देईन. गेली अनेक वर्षे या स्पर्धामध्ये खेळाडूंचा कस लागून मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता भारताला मिळाली आहे. उपलब्ध कालावधीनुसार ३६ संघांसाठी गट वाढवून कमी सामन्यांचे आकुंचित स्वरूपाचे वेळापत्रक आखता येईल. ट्वेन्टी-२० षटकांची स्पर्धा कमी दिवसांत संपू शकते. पण भावी क्रिकेटपटूंची फळी ही दीर्घकालीन सामन्यांतूनच मिळते. भारतात जैव-सुरक्षित वातावरणात क्रिकेट सामने होऊ शकतात, हा विश्वास वाटतो. नुकतीच एक ‘आयपीएल’ नोव्हेंबरमध्ये संपली, तर पुढील ‘आयपीएल’ एप्रिलमध्ये सुरू होईल. आता उपलब्ध चार महिन्यांच्या कालावधीत आणखी एका ट्वेन्टी-२० स्पर्धेची आवश्यकता आहे का, याचा विचार करायला हवा.

रणजी सामन्यांद्वारे उत्तम मानधन!

*  सुलक्षण कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक

करोनाची साथ ओसरते आहे आणि लस आवाक्यात येते आहे. त्यामुळे आगामी आव्हानांनुसार देशांतर्गत क्रिकेटची आखणी केल्यास रणजी करंडक स्पर्धेची नितांत आवश्यकता आहे. कारण फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडचा संघ भारतात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. परंतु रणजी आणि मुश्ताक अली असा तिसरा पर्याय सर्वंकष आहे. कारण येत्या ‘आयपीएल’मध्ये दोन संघ वाढणार आहेत. त्यामुळे लिलावासाठी या स्पर्धेतील ३६ संघांमधून आणखी काही गुणी खेळाडूंचा शोध लागावा म्हणून ‘बीसीसीआय’ मुश्ताक अली स्पर्धा घेत आहे. ‘आयपीएल’मधील संधीकडे आता राज्य संघटना गांभीर्याने पाहू लागल्या आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीने टी. नटराजनला भारतीय संघात स्थान मिळवता आले. रणजी सामने झाल्यास मर्यादित षटकांच्या तुलनेत खेळाडूंना अधिक मानधन मिळेल, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

मर्यादित षटकांच्या स्पर्धाकडे संघटनांचा कल!

* करसन घावरी, माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक

यंदाच्या क्रिकेट हंगामाचा विचार केल्यास रणजी करंडक स्पर्धा अत्यावश्यक आहे. ५० किंवा २० षटकांच्या स्पर्धा नाही झाल्या तरी चालतील, असे मला वाटते. कोणतीही स्पर्धा लवकर संपावी, याकडेच सर्व राज्य संघटनांचा कल आहे. रणजी करंडकाच्या आयोजनास ६७ दिवस लागतील. मात्र मर्यादित षटकांच्या स्पर्धा लवकर संपतात. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे, या दृष्टिकोनातून पाहिल्यास रणजी स्पर्धा देशातील क्रिकेटमधील गुणवत्तेची जोपासना करते, हे नाकारता येणार नाही. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचे सातत्य हे रणजीतून सिद्ध होईल, २० षटकांत नव्हे. याकरिता स्पर्धेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.

prashant.keni@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji and mushtaq ali must compete abn
First published on: 06-12-2020 at 00:14 IST