अंकित बावणेने केलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४८८ धावांवर डाव घोषित करताना रणजी करंडक क्रिकेट सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध २६० धावांची आघाडी मिळविली आहे. उर्वरित खेळात हिमाचलने दुसऱ्या डावात १ बाद ९८ धावा केल्या. बुधवारी शेवटच्या दिवशी त्यांचे उर्वरित नऊ फलंदाज झटपट बाद केल्यास महाराष्ट्राला निर्णायक विजय मिळविता येईल.
हिमाचलने पहिल्या डावात केलेल्या २२८ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने ४ बाद ३१९ धावांवर मंगळवारी आपला पहिला डाव पुढे सुरू केला. बावणेने केलेले शानदार शतक तसेच त्याने तीन फलदांजांसमवेत केलेल्या अर्धशतकी भागीदारी हेच महाराष्ट्राच्या मंगळवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. बावणे याने चिराग खुराणा याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी १३७ मिनिटांत ९७ धावांची भर घातली. खुराणाने सात चौकारांसह ४३ धावा केल्या. त्यानंतर बावणेने शतकाचा टप्पा ११ चौकारांच्या साहाय्याने पूर्ण केला. त्याने श्रीकांत मुंढे याच्या साथीत सहाव्या विकेटसाठी ८८  धावांची भर घातली. मुंढे याने ५८ धावा करताना आठ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. मुंढेच्या जागी आलेल्या अक्षय दरेकर यानेही दमदार खेळ करीत बावणेला चांगली साथ दिली. या जोडीने ६६ धावांची अखंडित भागीदारी केली. दरेकरने एक षटकार व दोन चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. बावणे याने ४०३ मिनिटांच्या खेळात नाबाद १३८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १२ चौकार मारले.
यंदाच्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे हे दुसरे शतक आहे. त्याने दुलीप सामन्यात पश्चिम विभागाकडून खेळताना दक्षिण विभागाविरुद्ध शतक केले होते. महाराष्ट्राने उपाहारानंतर ६ बाद ४८८ धावांवर डाव घोषित केला.
पहिल्या डावात २६० धावांनी पिछाडीवर असलेल्या हिमाचलने दुसऱ्या डावात प्रशांत चोप्रा याची विकेट लवकर गमावली. अनुपम सकलेचा याने त्याचा १७ धावांवर त्रिफळा उडविला. मात्र त्यानंतर वरुण शर्मा (नाबाद ३५) व पारस डोग्रा (नाबाद ४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची अखंडित भागीदारी केली.
महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण निश्चित केले आहेत. मात्र बाद फेरीच्या दृष्टीने त्यांना निर्णायक विजय महत्त्वाचा आहे. शेवटच्या दिवशी त्यांचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावरच त्यांचा निर्णायक विजय अवलंबून आहे.
संक्षिप्त धावफलक
हिमाचल प्रदेश : २२८ व ४० षटकांत १ बाद ९८ (वरुण शर्मा खेळत आहे ३५, पारस डोग्रा खेळत आहे ४१)
महाराष्ट्र : १४५ षटकांत ६ बाद ४८८ घोषित (हर्षद खडीवाले ९२, अंकित बावणे नाबाद १३८,श्रीकांत मुंढे ५८; विक्रमजित मलिक २/७१, ऋषी धवन २/१३१)