आजपासून वानखेडे स्टेडियमवर बलाढय़ कर्नाटकशी लढत
मुंबई : मुंबईच्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील (ब-गट) लढतीत कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणे आणि उदयोन्मुख फलंदाज पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीकडे प्रामुख्याने लक्ष असेल. याआधी रेल्वेविरुद्ध मुंबईने पत्करलेल्या मानहानीकारक पराभवात रहाणे, पृथ्वी अपयशी ठरले होते.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार इनडोअर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात वेगाने वाहनाऱ्या वाऱ्यांच्या आव्हानासह मुंबईच्या फलंदाजांना अभिमन्यू मिथुनच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या तेजतर्रार गोलंदाजांना सामोरे जावे लागणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढय़ संघ अशी ओळख असणाऱ्या कर्नाटकविरुद्धच्या लढतीत रहाणे आणि पृथ्वीने कामगिरी सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. पृथ्वी हा १० जानेवारीपासून भारत ‘अ’ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्याने हा त्याचा अखेरचा रणजी सामना असणार आहे. पृथ्वीने बडोद्याविरुद्धच्या रणजी लढतीत द्विशतक झळकावले होते.
रेल्वेविरुद्धच्या पराभवानंतर ४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईचे सर्वच विभागांमधील कच्चे दुवे समोर आले आहेत. भारतीय संघाला कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांची उणीव तीव्रतेने भासणार आहे. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव, संकटमोचक फलंदाज सिद्धेश लाड आणि अनुभवी आदित्य तरे यांच्यावर मुंबईच्या संघाची भिस्त असेल. यादवसुद्धा १० जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या सामन्यासाठी सर्फराज खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तुषार देशपांडे मुंबईच्या गोलंदाजीच्या माऱ्याचे नेतृत्व करील.
भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल कर्नाटकच्या संघात या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मयंकला आगामी मालिकांच्या पार्श्वभूमीवर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कर्णधार करुण नायर आणि देवदत्त पडिक्कल यांच्यावर संघाची मदार असेल.