पुणे : कर्णधार अंकित बावणे (नाबाद १५२) आणि अझिम काझी (नाबाद १०३) यांच्या शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने तमिळनाडूविरुद्धच्या ब-गटाच्या सामन्यात आपल्या दुसऱ्या डावात ५ बाद ३६४ धावसंख्येपर्यंत मजल मारली. मात्र, सामना अनिर्णित राहिला. महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली.

अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद १०४ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. बावणेने संघाच्या सुरुवातीपासूनच धावसंख्येत भर घातली. सौरभ नवाळे (१०) आणि केदार जाधव (१५) बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या काझीने बावणेसह भागीदारी रचताना तमिळनाडूच्या गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. दोघांनीही सहाव्या गडय़ासाठी १९७ धावांची अभेद्य भागीदारी रचताना सामना अनिर्णित राखण्यात योगदान दिले. बावणेने आपल्या खेळीत १३ चौकार व तीन षटकार तर, काझीने १० चौकार व तीन षटकार लगावले. तमिळनाडूकडून संदीप वॉरियर (३/८०) आणि साई किशोरने (२/१०८) यांनी चांगली गोलंदाजी केली.

त्यापूर्वी, महाराष्ट्राने आपल्या पहिल्या डावात ४४६ धावा केल्या होत्या. यानंतर आपल्या पहिल्या डावात तमिळनाडूला ४०४ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.

संक्षिप्त धावफलक

* महाराष्ट्र (पहिला डाव) : ९८ षटकांत सर्वबाद ४४६.

* तमिळनाडू (पहिला डाव) : ११८.५ षटकांत सर्वबाद ४०४.

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : ९०.३ षटकांत ५ बाद ३६४ (अंकित बावणे नाबाद १५२, अझिम काझी नाबाद १०३; संदीप वॉरियर ३/८०)   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकित बावणे