पहिल्या दिवसअखेर ओदिशाची ५ बाद २२० धावांपर्यंत मजल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दमदार सलामीनंतर एक वेळ ओदिशाची ५ बाद ९६ धावा अशी अवस्था केली असताना महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सामन्यात ओदिशाने पहिल्या डावात ५ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसअखेर शंतनू मिश्रा ८४, तर राजेश धुपर ६७ धावांवर खेळत आहेत.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला; परंतु ओदिशाचे सलामीवीर शंतनू आणि अनुराग सारंगी यांनी ६२ धावांची सलामी देत अप्रतिम सुरुवात केली. सत्यजित बच्छावने सारंगीला (४१) पायचीत पकडून ही जोडी फोडली.

त्यानंतर आशय पालकरच्या (२/४६) भेदक वेगवान माऱ्यापुढे ओदिशाची घसरगुंडी उडाली. कर्णधार सुधांशू सेनापतीसह आणखी दोन फलंदाज एकेरी धावसंख्येवरच माघारी परतल्यामुळे ओदिशाने १०० धावांच्या आतच चार फलंदाज गमावले.

मुकेश चौधरीने अभिषेक राऊतला (१२) धावचीत करून ओदिशाला पाचवा धक्का दिला. मात्र सातव्या क्रमांकावरील राजेशच्या साथीने सलामीवीर शंतनूने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १२४ धावांची अभेद्य भागीदारी रचल्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे ओदिशाचा डाव कमीत कमी धावांत गुंडाळण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.

संक्षिप्त धावफलक

ओदिशा (पहिला डाव) : ८८ षटकांत ५ बाद २२० (शंतनू मिश्रा खेळत आहे ८४, राजेश धुपर खेळत आहे ६७; आशय पालकर २/४६)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy cricket tournament akp 94
First published on: 05-02-2020 at 01:08 IST