पीटीआय, बंगळूरु : डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१८१) आणि अरमान जाफर (१२७) यांनी साकारलेल्या दिमाखदार शतकांमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने उत्तर प्रदेशवरील वर्चस्व कायम राखले आहे. मुंबईने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ४४९ अशी शानदार मजल मारत एकूण ६६२ धावांची आघाडी मिळवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौथ्या दिवशी १ बाद १३३ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मुंबईकडून जैस्वाल आणि जाफर या युवा फलंदाजांनी दुसऱ्या गडय़ासाठी २८६ धावांची भागीदारी रचली. जैस्वालने धावांचे खाते उघडण्यासाठी तब्बल ५४ चेंडू घेतले होते. त्यानंतर मात्र त्याला सातत्याने धावफलक हलता ठेवण्यात यश आले. त्याने बाद फेरीतील सलग तिसरे शतक झळकावताना ३७२ चेंडूंत २३ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने १८१ धावांची खेळी केली.

जैस्वालला तिसऱ्या क्रमांकावरील जाफरची तोलामोलाची साथ लाभली. जाफरने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक करताना २५९ चेंडूंत १२७ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. अखेर जाफरला शिवम मावीने, तर जैस्वालला प्रिन्स यादवने राखीव खेळाडू आर्यन जुयालकरवी झेलबाद केले. उपांत्यपूर्व सामन्यातील द्विशतकवीर सुवेद पारकर (४९ चेंडूंत २२ धावा) अपयशी ठरला. यानंतर मात्र सर्फराज खान (५८ चेंडूंत नाबाद २३) आणि शम्स मुलानी (३५ चेंडूंत नाबाद १०) यांनी मुंबईचा संघ आणखी गडी गमावणार नाही हे सुनिश्चित केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ३९३

उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १८०

मुंबई (दुसरा डाव) : १४० षटकांत ४ बाद ४४९ (यशस्वी जैस्वाल १८१, अरमान जाफर १२७; प्रिन्स यादव २/६९, शिवम मावी १/३६)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy cricket tournament jaiswal jaffer brilliant centuries mumbai lead ysh
First published on: 18-06-2022 at 01:51 IST