Ranji Trophy Cricket Tournament पुणे : प्रदीप दाढे (३/६७) व राजवर्धन हंगर्गेकर (३/११५) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे महाराष्ट्राने तमिळनाडूला पहिल्या डावात ४०४ धावांवर रोखत निर्णायक आघाडी मिळवली. यानंतर तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद १०४ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यामुळे त्यांच्याकडे एकूण १४६ धावांची आघाडी होती.
तिसऱ्या दिवशी तमिळनाडूने पहिल्या डावात ४ बाद २६७ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. प्रदोश पॉलच्या (८४) रूपात संघाला पाचवा धक्का बसला. यानंतर विजय शंकरने (१०७) तमिळनाडूच्या धावसंख्येत भर घालणे सुरू ठेवले. त्याला अश्विन क्रिस्ट (१८) व अजिथ राम (२४) यांची काहीशी साथ मिळाली. मात्र, शंकरच्या शतकानंतरही तमिळनाडूला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही.
यानंतर, फलंदाजीस उतरलेल्या महाराष्ट्राची दुसऱ्या डावात सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर सिद्धेश वीर (०) व ऋतुराज गायकवाड (५) हे लवकर माघारी परतले. यानंतर राहुल त्रिपाठी (६१) व अंकित बावणे (नाबाद २४) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.