बंगळूरु : MUM vs MP Ranji Trophy Final 2022 : मुंबईकर चंद्रकांत पंडित यांची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये गणना का होते, याचा रविवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील मध्य प्रदेश संघाने ४१ वेळा विजेत्या मुंबईवर सहा गडी राखून मात करत पहिल्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३ वर्षांपूर्वी बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला कर्नाटकाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी पंडित हे मध्य प्रदेशचे कर्णधारपद भूषवत होते. त्यानंतरच्या दोन दशकांत पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून पाच वेळा रणजी करंडक जिंकला. मात्र, त्या पराभवाचे शल्य त्यांच्या मनात होते. त्यामुळे रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवरच मध्य प्रदेशने पहिल्यांदा रणजीच्या जेतेपदावर कब्जा केल्यानंतर प्रशिक्षक पंडित यांना अश्रू अनावर झाले.

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील द्रोणाचार्य अशी ख्याती असलेल्या पंडित यांच्या मार्गदर्शनात विदर्भाने अनपेक्षितरीत्या दोन वेळा (२०१७-१८, २०१८-१९) रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते. त्या संघात वसिम जाफरचा अपवाद वगळता तारांकित खेळाडूंचा समावेश नव्हता. आता पुन्हा फलंदाज रजत पाटीदारचा अपवाद वगळता युवा आणि फारसा नावलौकिक नसलेल्या खेळाडूंची मोट बांधून पंडित यांनी मध्य प्रदेशला पहिल्यांदा रणजी करंडक मिळवून दिला.

पाचदिवसीय अंतिम सामन्यात सर्फराज खानच्या (१३४ धावा) शतकामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर मध्य प्रदेशने ५३६ धावांची मजल मारत पहिल्या डावात १६२ धावांची आघाडी मिळवली. त्यांच्याकडून यश दुबे (१३३), पाटीदार (१२२) आणि शुभम शर्मा (११६) यांनी शतकी योगदान दिले. मग पाचव्या दिवशी मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांत आटोपल्यामुळे मध्य प्रदेशला ऐतिहासिक विजयासाठी १०८ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान त्यांनी २९.५ षटकांत आणि चार गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून हिमांशु मंत्री (३७), शुभम शर्मा (३०), पाटीदार (नाबाद ३०) यांनी उत्तम फलंदाजी केली.

मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने अंतिम सामन्याच्या दोन्ही डावांत (५/१७३ व ३/४१) टिच्चून मारा केला. मात्र, त्याला इतर गोलंदाजांची साथ न लाभल्याने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबईला जेतेपदापासून वंचित राहावे लागले. अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनात प्रथमच खेळताना मुंबईच्या संघाने सकारात्मक वाटचाल केली. त्यांना २०१७ नंतर पहिल्यांदा रणजीची अंतिम फेरी गाठण्यात यश आले. मात्र, सर्वात महत्त्वाच्या सामन्यात त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ३७४

मध्य प्रदेश (पहिला डाव) : ५३६

मुंबई (दुसरा डाव) : ५७.३ षटकांत सर्व बाद २६९ (सुवेद पारकर ५१, सर्फराज खान ४५; कुमार कार्तिकेय ४/९८, पार्थ सहानी २/४३)

मध्य प्रदेश (दुसरा डाव) : २९.५ षटकांत ४ बाद १०८ (हिमांशु मंत्री ३७, रजत पाटीदार नाबाद ३०; शम्स मुलानी ३/४१)

रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना गमावण्याची मुंबईची ही सहावी वेळ होती. त्यांनी ४१ अंतिम सामने जिंकले आहेत.

९८२ मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने यंदा रणजीमध्ये सर्वाधिक ९८२ धावा (सहा सामन्यांच्या नऊ डावांत) केल्या. त्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तसेच मुंबईच्या फलंदाजाने एका हंगामात केलेल्या या चौथ्या सर्वाधिक धावा ठरल्या.

चंद्रकांत पंडित यांची प्रशिक्षक म्हणून रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ही एकूण सहावी वेळ ठरली. त्यांनी मुंबईला तीन वेळा (२००२-०३, २००३-०४, २०१५-१६), विदर्भाला दोन वेळा (२०१७-१८, २०१८-१९), तर आता मध्य प्रदेशला एकदा जेतेपद मिळवून दिले.

२० रणजी करंडकावर आपले नाव कोरणारा मध्य प्रदेश हा २०वा संघ ठरला. त्यांनी एकदा उपविजेतेपद मिळवले आहे.

२३ वर्षांपूर्वी मला कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला रणजी स्पर्धेचे जेतेपद पटकावून देता आले नव्हते. त्याची मला खंत होती. माझे इथे (चिन्नास्वामी स्टेडियम) काही तरी राहिले असल्याची भावना होती. त्यामुळे यंदा ही स्पर्धा जिंकल्यानंतर मी भावुक झालो. संघ म्हणून कोणताही करंडक पटकावणे समाधानकारक असते. मात्र, यंदाचे जेतेपद माझ्यासाठी अधिक खास आहे.

चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक, मध्य प्रदेश

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy final 2022 mp beat mumbai by six wickets zws
First published on: 27-06-2022 at 03:24 IST