अंतिम सामन्याचे दडपण किती कठीण असते, याचाच प्रत्यय घडवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आत्मघातकी खेळ करीत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकची विजेतेपदाची बाजू वरचढ केली. गणेश सतीश (नाबाद ११७) व लोकेश राहुल (नाबाद ९४) यांच्या द्विशतकी भागीदारीसह कर्नाटकने बिनबाद २३० असे खणखणीत उत्तर दिले. त्याआधी महाराष्ट्राने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या.
उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, त्यामुळेच ५ बाद २७२वरून त्यांचा डाव ३०५ धावांमध्ये आटोपला. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूलच आहे, याचा प्रत्यय घडवत कर्नाटकने पहिल्या डावात बिनबाद २३० धावा करीत महाराष्ट्राला खणखणीत उत्तर दिले. गणेशने केलेले नाबाद शतक व राहुलची नाबाद ९४ धावांची खेळी हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. तेथेच त्यांनी विजेतेपदासाठी आपली बाजू वरचढ केली आहे. काही चमत्कार घडला तरच महाराष्ट्राला आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राने ५ बाद २७२ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. त्यावेळी ते ३५० धावांचा पल्ला गाठतील अशी अपेक्षा होती. मात्र कर्नाटकच्या गोलंदाजांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मारा केला. त्यांना क्षेत्ररक्षकांची योग्य साथ मिळाली. त्यामुळे आणखी केवळ ३३ धावांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे उर्वरित पाच फलंदाज तंबूत धाडले. शतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या अंकित बावणेचा त्रिफळा उडवत अभिमन्यू मिथुनने महाराष्ट्राच्या डावास भगदाड पाडले. तेथून महाराष्ट्राच्या घसरगुंडीला प्रारंभ झाला. बावणे हा पहिल्या दिवशीच्या ८९ धावांमध्ये एकही धावेची भर घालू शकला नाही. पाठोपाठ श्रीकांत मुंढेला (७) श्रीनाथ अरविंदच्या षटकांत मनीष पांडेने अप्रतिमरीत्या बाद केले. एका बाजूने दमदार अर्धशतक करणारा संग्राम अतितकर हा ५० धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राचा डाव ३०५ धावांमध्ये कोसळला. कर्नाटककडून आर. विनय कुमार, अरविंद व मिथुन यांनी प्रत्येकी तीन बळी घेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राला सव्वातीनशे धावांमध्ये गुंडाळण्याचा आत्मविश्वास कर्नाटकचा गोलंदाज अरविंदने सार्थ ठरविला.
ज्या खेळपट्टीवर कर्नाटकच्या गोलंदाजांनी प्रभुत्व गाजवले, त्याच खेळपट्टीवर महाराष्ट्राच्या गोलंदाजांना प्रभाव दाखविता आला नाही. अर्थात उपाहारापूर्वी महाराष्ट्राने तीन जीवदाने देत कर्नाटकच्या फलंदाजांना अप्रत्यक्षपणे मदतच केली. बळी मिळत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या गोलंदाजांमध्ये व क्षेत्ररक्षकांमध्ये सतत नैराश्य दिसून आले. त्याचा पुरेपूर फायदा घेत कर्नाटकच्या फलंदाजांनी मनमुरादपणे फटकेबाजी केली. त्यांचा सलामीवीर रॉबिन उथप्पा हा १० धावांवर असताना समद फल्लाहचा चेंडू त्याच्या हाताच्या कोपराला जोरदार बसला. त्यामुळे तो निवृत्त होऊन तंबूत परतला. त्यानंतर लोकेश राहुल व गणेश सतीश यांनी आत्मविश्वासाने फलंदाजी करीत महाराष्ट्राच्या फलंदाजांना कशी फलंदाजी करायची असते, याचा प्रत्यय घडवला. त्यांनी एकेरी-दुहेरी धावांप्रमाणेच सोप्या चेंडूंना सीमापार करण्याची कोणतीही संधी दवडली नाही. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत बदल झाले तरी त्यांचा कोणतीही परिणाम या जोडीवर झाला नाही. चहापानापर्यंत त्यांनी संघाचा डाव बिनबाद १२६ धावांपर्यंत नेत आघाडी घेण्यासाठी भक्कम पाया रचला. त्यामुळेच चहापानाच्या वेळी कर्नाटकच्या खेळाडूंनी फुटबॉलचा आनंद घेतला.
चहापानानंतर राहुल व गणेश या युवा फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. राहुलने चिराग खुराणाला उत्तुंग षटकार खेचून सामन्यातील पहिला षटकार नोंदवला. दुसऱ्या बाजूने गणेशनेही महाराष्ट्राची गोलंदाजी चोपून काढली. फलंदाजांवर दडपण आणण्यासाठी प्रभावी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करण्यात महाराष्ट्राला अपयश आले. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाचा अभावच दिसून आला. सतीशने अतितकरला सुरेख चौकार मारुन शतक पूर्ण केले. त्याने हा टप्पा १७४ चेंडूंमध्ये पार केला. महाराष्ट्राच्या क्षेत्ररक्षकांनी राहुलला ०, १४ व ७४ धावांवर जीवदान दिले तर गणेशला ६ व ८९ धावांवर जीवदान दिले. राहुल व गणेश यांनी द्विशतकी भागीदारी ३५५ चेंडूंमध्ये पूर्ण केली. राहुलने १६ चौकारांसह नाबाद ११७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र (पहिला डाव) : १०४.१ षटकांत सर्वबाद ३०५ (चिराग खुराणा ६४, अंकित बावणे ८९, संग्राम अतितकर ५०; आर. विनयकुमार ३/८१, अभिमन्यु मिथुन ३/४९, श्रीनाथ अरविंद ३/६५.
कर्नाटक (पहिला डाव) : ६८ षटकांत बिनबाद २३० (लोकेश राहुल खेळत आहे ९४, गणेश सतीश खेळत आहे ११७)
‘‘मला लोकेश राहुलने चांगली साथ दिली, त्यामुळेच शतक पूर्ण करू शकलो. अंतिम लढतीत शतक करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तिसऱ्या दिवशी संघाला आघाडी मिळवून देण्यासाठीच मी खेळणार आहे. मी आजपर्यंत संघाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठीच खेळलो आहे.
– गणेश सतीश