India vs England 3rd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना काही खास विक्रमांसाठी नेहमीच आठवणीत राहिल. पहिला सर्वात मोठा विक्रम म्हणजे, केएल राहुल लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दोन शतकं झळकावणारा भारताचा पहिलाच सलामीवीर फलंदाज ठरला. दुसरा मोठा विक्रम भारताचा पहिला डाव आटोपल्यानंतर बनला. या सामन्यात असं काही घडलं आहे, जे गेल्या १० वर्षांत घडलं नव्हतं.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जो रूटने १०४ धावांची खेळी केली. तर ब्रायडन कार्सने ५६ आणि जेमी स्मिथने ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या.
इंग्लंडने ४ सत्र फलंदाजी करत ३८७ धावा केल्या. भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताकडून सलामीला आलेल्या केएल राहुलने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ७२ आणि ऋषभ पंतने ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३५० धावांचा पल्ला गाठला. इथून पुढे भारताला आघाडी मिळणार असं चित्र दिसत होतं.
वॉशिंग्टन सुंदरने एक बाजू धरून ठेवली होती. दुसऱ्या बाजूने आकाशदीप, जसप्रीत बुमराह आले आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात स्वस्तात बाद झाले. भारतीय संघाचा डाव ३८७ धावांवर आटोपला. भारतानेही इंग्लंडच्या ३८७ धावांची बरोबरी केली. त्यामुळे पहिल्या डावातील खेळ बरोबरीत समाप्त झाला. आता दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ बॅझबॉल स्टाईल फलंदाजी करून भारतीय संघासमोर मोठं आव्हान ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
१० वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं
कसोटी क्रिकेटची खरी मजा म्हणजे ३ दिवसांचा खेळ संपला आहे. पण दोन्ही संघ आता बरोबरीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात जे काही होईल, त्यावरून सामन्याचा निकाल लागणार आहे. २०१५ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. याआधी २०१५ मध्येही असा दुर्मिळ प्रसंग घडला होता जिथे पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावसंख्या नोंदवली होती. हेडिंग्लेच्या मैदानावर झालेल्या इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांचा पहिला डाव ३५० धावांवर आटोपला होता.