कसोटी क्रिकेट हा खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणारा सर्वोत्तम प्रकार आहे. मात्र पाच सामन्यांची मालिका असू नये, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी दी प्रेस क्लब मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
‘‘दोन कसोटी सामन्यांची मालिका असू नये. कारण त्यात स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एका संघाने सलग तीन सामने कसोटी जिंकले तर त्यानंतरच्या सामन्यात पुनरागमन करणे कठीण जाते. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाला फायदा होतो. त्यांना खेळपट्टय़ांची अचूक जाण असते, त्यानुसार डावपेच आखले जातात. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका हरला म्हणून मी हे म्हणत नाही. पण अशा मालिका खेळाला आणि खेळाडूंना उपयुक्त नाहीत. कोणत्याही दोन संघांतील कसोटी मालिका तीन सामन्यांपुरती मर्यादित असावी,’’ अशी सूचना शास्त्री यांनी केली.
धोनीच्या नेतृत्व क्षमतेबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘इंग्लंडच्या दौऱ्यातील संघ पाहता धोनी हाच कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय होता. वीस बळी घेऊ शकतील असे गोलंदाज संघात नसतील तर कर्णधाराला डावपेच आखणे कठीण जाते. त्यामुळे इंग्लंडमधील ढासळत्या कामगिरीसाठी धोनीला जबाबदार येणार नाही. डंकन फ्लेचर यांच्याशी माझे ऋणानुबंध खूप जुने आहेत. शंभरहून अधिक कसोटी सामन्यांचा प्रशिक्षणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. एखाद्या दौऱ्यातील खराब कामगिरीसाठी त्यांना दोषी ठरवता येणार नाही.’’
जबरदस्त फॉर्मात असलेल्या सुरेश रैनाबाबत आशावादी असल्याचे शास्त्रीने सांगितले. ते म्हणाले, ‘‘रैनाच्या फलंदाजीतील नैपुण्य अफलातून आहे. त्याची फलंदाजी पाहणे आनंददायी असते. तो कसोटी संघात परतावा असे मनापासून वाटते.’’ विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीविषयी शास्त्री म्हणाले, ‘‘विराट संघातील सगळ्यात मेहनती खेळाडू आहे. त्याची फलंदाजी सर्वसमावेशक आहे. इंग्लड दौऱ्यातील अपयशातून तो निश्चित अधिक परिपक्व फलंदाज म्हणून समोर येईल.’’
बीसीसीआय आणि एन.श्रीनिवासन यांच्याशी विशेष सख्य असल्याच्या प्रश्नावर शास्त्री यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ‘‘संघाच्या कामगिरीत सुधारणा आणि सातत्य असावे यासाठी बीसीसीआयने माझी नियुक्ती केली आहे. काही वर्षांपूर्वी बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव होता. त्यावेळी खेळाडूंनी त्यांची भूमिका बीसीसीआयसमोर मांडण्यासाठी माझी निवड केली आहे. माझे सर्वाशी चांगले संबंध आहेत, परंतु माझे उद्दिष्ट क्रिकेट आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलवर टीका, ही प्रथाच!
‘‘इंडियन प्रीमिअर लीगवर टीका करण्याची प्रथाच पडली आहे. जेव्हा इतक्या मोठय़ा पातळीवर एखादी स्पर्धा आयोजित होते, तेव्हा त्यातली छोटय़ाशा त्रुटीचासुद्धा बागुलबुवा केला जातो. या स्पर्धेने खेळाडूंना पैसा मिळवून दिला आहे. कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आयपीएलच्या यशाने अन्य देशातील असंख्य व्यक्तींच्या पोटात दुखते. कारण हे काम त्यांना करता आले नाही,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.

संशयास्पद शैलीविरुद्ध कडक भूमिका
‘‘गोलंदाजीची शैली संशयास्पद आढळणाऱ्या गोलंदाजांच्या शैलीवर कारवाई करणे आवश्यक आहे. ही भूमिका काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवी होती. मात्र अद्याप उशीर झालेला नाही. आयसीसीच्या तांत्रिक समितीचा मी सदस्य आहे. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संशयास्पद शैली असणाऱ्या गोलंदाजांवर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे,’’ अशी माहिती शास्त्री यांनी दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri not in fever of the five match test series
First published on: 07-10-2014 at 01:58 IST