भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर आपले मत मांडले असून भारताच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शास्त्री आणि कोहलीच्या जोडीने टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली. मात्र, विराटकडून आता भारताच्या वनडे संघाचे कप्तानपद काढून घेतले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा वनडे कर्णधार बनवण्यात आले आहे. आता विराट कोहलीकडे केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. विराट कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयावर शास्त्री म्हणाले, ''निकालांच्या आधारे त्रुटी शोधणे सोपे आहे, परंतु या भारतीय स्टारने आपल्या कार्यकाळात जे काही साध्य केले आहे, ती अभिमानाची गोष्ट आहे.'' 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, "दिवसाच्या शेवटी, तो एक कुशल कर्णधार आहे. तुम्ही किती धावा केल्या यावरून लोक तुमचा निकाल नेहमी ठरवतील. त्याचा चांगला विकास झाला आहे. तो खेळाडू म्हणून परिपक्व झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार होणे सोपे नाही. त्याने जे काही मिळवले, त्याचा त्याला अभिमान वाटला पाहिजे. मला आठवते की सनीने (सुनील गावसकर) त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडून दिले. सचिन तेंडुलकरनेही हेच काम केले. विराट कोहली कसोटी क्रिकेटच्या बाबतीत किती समर्पित आहे, हे आपण सर्व जाणतो. संघाला यशस्वी करण्यासाठी तो आपले सर्वस्व देतो.'' हेही वाचा - भारताचा महान ऑफस्पिनर हरभजन सिंग घेणार आयुष्यातील सर्वात ‘मोठा’ निर्णय; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत! रोहित शर्माला वनडेचे कर्णधारपद मिळाल्यावर शास्त्री म्हणाले, "रोहित शर्मा नेहमीच संघासाठी जे सर्वोत्तम आहे, ते करतो. संघातील प्रत्येक खेळाडूचा तो पुरेपूर फायदा घेतो. रोहित आणि विराट कोहली हे एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारचे महान खेळाडू आहेत. या संघाकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी पराभूत केले.'' विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे संबंध फार चांगले होते. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कोहलींमुळेच रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि दोन्ही खेळाडू एकमेकांचे खूप कौतुक करतात. मात्र, रवी शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता विराट कोहलीही केवळ एकाच फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिला आहे.