वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी बिश्नोईला संधी; कुलदीपचे पुनरागमन

अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुधवारी निवडण्यात आलेल्या भारताच्या दोन्ही संघांमधून वगळण्यात आले आहे. युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईने प्रथमच भारतीय संघात स्थान मिळवले आहे, तर मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे पुनरागमन झाले आहे.

तंदुरुस्ती चाचणीचा अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अहमदाबाद येथे ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यानंतर कोलकाता येथे ट्वेन्टी-२० मालिका होणार आहे. करोनाची लागण झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेला मुकलेला वाँशिग्टन सुंदर भारतीय संघात परतला आहे.

जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना या मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय‘चे सचिव जय शाह यांनी दिली. अश्विनला दुखापतीमुळे सहा आठवड्यांची विश्रांती देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ‘बीसीसीआय’च्या प्रसिद्धिपत्रकात अश्विनच्या दुखापतीबाबत नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत छाप न पाडू शकलेला अश्विन दुखापतीतून सावरला तरी त्याला संघात सामील केले जाणार नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय संघातून डच्चू दिला आहे, परंतु ट्वेन्टी-२० संघातील स्थान त्याने टिकवले.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विजयवीराची क्षमता असलेल्या दीपक हुडाला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. त्याने बडोद्याला सोडचिठ्ठी देऊन राजस्थानकडून खेळण्यास प्रारंभ केल्यानंतर मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक या स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी केली. परंतु एम. शाहरुख खान, रिशी धवन निवड समितीचे लक्ष वेधू शकले नाही.

उपकर्णधार केएल राहुल वैयक्तिक कारणास्तव पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे, परंतु दुसऱ्या सामन्यापासून तो उपलब्ध असेल. अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. अक्षर पटेल ट्वेन्टी-२० संघातून खेळणार आहे.

रवी हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज संघाला गवसलेला तारा आहे. येत्या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्स संघातून खेळणार आहे. ४२ ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याने ४९ बळी मिळवले आहेत, तर १७ अ-श्रेणीच्या सामन्यांमध्ये त्याने २४ बळी मिळवले आहेत. कुलदीप, यजुवेंद्र आणि रवी यांच्यासह निवड समितीने पुन्हा मनगटी फिरकीवर विश्वास प्रकट केला आहे.

एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाँशिग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान.

एकदिवसीय संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाँशिग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आवेश खान.