Ravichandran Ashwin Creates History: रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयपीएलला देखील अलविदा केलं. यादरम्यान अश्विन जगातील इतर टी-२० लीगमध्ये खेळताना दिसू शकतो अशी चर्चा होती. इंटरनॅशनल लीग टी-२०, बिग बॅश लीगमध्ये अश्विन खेळणार अशी चर्चा होती. आता अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. या लीगमध्ये खेळण्यासह त्याने एक मोठा ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावे केला आहे.
रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेतील सिडनी थंडर या संघाचा तो भाग असणार आहे. याची घोषणा स्वत: सिडनी थंडर या संघाने केली आहे. अश्विन हा सिडनी थंडर संघासाठी आतापर्यंतचा विदेशी खेळाडूसह केलेला सर्वात मोठा करार असल्याचं म्हटलं आहे. गेल्या हंगामात सिडनी थंडर्स संघाला होबार्ट हरिकेन्सकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.
बिग बॅश लीगमध्ये खेळणारा अश्विन पहिला भारतीय क्रिकेटपटू
रविचंद्रन अश्विन हा बिग बॅश लीग स्पर्धेत खेळणारा पहिला पुरूष भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. “थंडर संघातील माझी भूमिका कशी असणार आहे याबाबत अगदी स्पष्ट माहिती मला दिली गेली. संघाचे नेतृत्त्व करणाऱ्यांशी माझ्या चर्चा खूप चांगल्या झाल्या आणि माझ्या भूमिकेबाबत आम्ही पूर्णपणे एकमत आहोत. मला डेव्ह वॉर्नरचा खेळण्याचा अंदाज खूप आवडतो आणि तुमचा नेता तुमच्याच विचारसरणीशी जुळणारा असेल तर सगळं अजून उत्तम होतं. मला ‘थंडर नेशन’साठी खेळण्याची आता उत्सुकता आहे.”
रविचंद्रन अश्विनची कारकीर्द
रविचंद्र अश्विनने भारतीय संघाकडून सर्व फॉरमॅटमध्ये एकूण २८७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ७६५ आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. त्यापैकी ५३७ विकेट्स त्याने कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आठवा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
अश्विनने भारतासाठी २०११चा क्रिकेट वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, त्याला २०१६ साली आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं.
अश्विनची आयपीएल कारकीर्द
अश्विनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत तब्बल १६ हंगाम खेळले असून, त्यात त्याने पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी २२१ सामने खेळले आहेत. यासह तो आयपीएलमधील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी २०१० आणि २०११ मध्ये दोन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकलं आहे. तसेच आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १८७ बळी असून, तो या स्पर्धेच्या सर्वकालीन सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
सिडनी थंडर बीबीएलसाठी संघ (Sydney Thunder BBL 15 Squad)
वेस अगर, टॉम अँड्र्यूज, रविचंद्रन अश्विन (भारत), कॅमेरॉन बेनक्रॉफ्ट, सॅम बिलिंग्ज (इंग्लंड) ऑली डेव्हिस, लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड), मॅथ्यू गिल्क्स, ख्रिस ग्रीन, रायन हॅडली, शादाब खान (पाकिस्तान), सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, ब्लेक निकितारस, डॅनियल सॅम्स, तन्वीर संघा, डेव्हिड वॉर्नर.