भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजा सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यात कसोटी संघात स्थान मिळून देखील त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. संघात स्थान मिळवण्यातील अपयशाचे दु:ख त्याने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या अपयशातून पुन्हा यश मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न करायला हवे, असं ट्विट त्यानं केलं. भावना व्यक्त केल्यानंतर त्यानं हे ट्विट डिलिट देखील केलं. मात्र आता दुसऱ्या दोन सामन्यातून वगळल्यानंतर जाडेजाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये त्याच्या तोंडातून धूर येताना दिसत आहे.  नाईट आऊट उत्तम होती, असे सांगत त्यानं स्वत:ला राजपूत बॉय असल्याचा उल्लेख कॅप्शनमध्ये केल्याचे दिसून येते. आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी दिली जात आहे. परिणामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांना निवड समितीने विश्रांती दिली. मात्र अक्षर पटेल जखमी झाल्यामुळे पहिल्या तीन सामन्यात जाडेजाला संघात स्थान देण्यात आले. पटेल पुन्हा मैदानात उतरण्यास तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा रवींद्र जाडेजाला बाहेर ठेवण्यात आले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे जाडेजाला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. नवोदित गोलंदाजांची कामगिरी पाहता भविष्यात जाडेजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे मत काही दिवसांपूर्वीच फिरकीपटू हरभजनने व्यक्त केले होते. यापूर्वी जाडेजा श्रीलंका दौऱ्यावर कसोटी सामन्यात मैदानात दिसला होता. कोलंबोमध्ये रंगलेल्या कसोटी सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात ७ बळी आणि पहिल्या डावात ७० धावांची खेळी करुन त्यानं गोंलदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात धमक दाखवली होती.