Ravindra Jadeja World Record IND vs ENG: भारताचा वर्ल्ड नंबर वन अष्टपैलू खेळाडू असलेल्या रवींद्र जडेजाने मोठा विक्रम केला आहे. भारत वि. इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाने गिलला चांगली साथ देत महत्त्वपूर्ण धावसंख्या रचली आहे. यादरम्यान दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाची वादळी फलंदाजी पाहायला मिळाली. पण जडेजाचं शतक मात्र अवघ्या काही धावांनी हुकलं. पण यादरम्यान रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. जा आजवर कोणत्याच खेळाडूने केलेला नाही.

भारतीय संघाने पहिल्याच दिवशी २११ धावांवर ५ विकेट्स गमावले होते. पहिल्या कसोटीप्रमाणे भारतीय संघाची खालची फलंदाजी फळी पुन्हा कोसळणार, असं चित्र दिसत होतं. पण जडेजाने गिलच्या साथीने भारताचा डाव सावरला. यासह पहिल्याच दिवशी दोघांनी ९९ धावांची भागीदारी रचली. तर गिलने शतक झळकावलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर जडेजा आणि गिलने शतकी भागीदारी पूर्ण केली.

दुसऱ्या दिवशी जडेजाने ८० चेंडूत ५० धावा पूर्ण करत अर्धशतक झळकावलं. यानंतर गिल आणि जडेजाने २०० धावांची भागीदारी पूर्ण केली. पण नंतर जोश टंगच्या शॉर्ट बॉलवर जड्डू बाद झाला. जडेजा १३७ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ८९ धावा करत माघारी परतला. पण तोपर्यंत जडेजाने मात्र विश्वविक्रम रचला होता.

रवींद्र जडेजाचा वर्ल्ड रेकॉर्ड

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं चक्र सुरू आहे. टीम इंडियाची ही २०२५-२७ च्या चक्रातील पहिलीच मालिका आहे. रवींद्र जडेजाने या स्पर्धेत आता २००० धावा पूर्ण केल्या आहेत. रवींद्र जडेजाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ४१ कसोटी सामने खेळले आहेत आणि २०१० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत.

रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० धावांचा टप्पा गाठला आणि १०० विकेट्सही घेतल्या आहेत. आता तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात २००० धावा करणारा आणि १०० विकेट्स घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. जर मालिकेतील हा सामनाही भारताने गमावला तर इथून पुनरागमन करणं भारतासाठी अवघड होणार आहे.