राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना खेळवला गेला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्या राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची पिसे काढली. बंगळुरूच्या फलंदाजापाठोपाठ गोलंदाजाचीदेखील कामगिरी ढासळ्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद सर्वात जास्त महागडे ठरले. खास करून मोहम्मद सिराज जास्त चर्चेत राहिला. कारण, क्वॉलिफायर सामन्यात त्याच्या नावे एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर या आयपीएल हंगामात ३० षटकार मारले गेले आहेत. आयपीएलच्या कोणत्याही हंगामात एका गोलंदाजाविरुद्ध मारले गेलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानच्या डावाच्या सुरुवातीला जेव्हा यशस्वी जैसवालने सिराजला एक उत्तुंग षटकारा मारला तेव्हा त्याने ड्वेन ब्राव्होच्या २९ षटकारांचा विक्रम मागे टाकला. २०१८ च्या हंगामात ब्राव्होच्या गोलंदाजीवर २९ षटकार खेचले गेले होते.

आयपीएल २०२२ हंगाम मोहम्मद सिराजसाठी खूपच खराब गेला आहे. सिराजने १५ सामन्यांमध्ये नऊपेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत आणि फक्त ९ बळी मिळवले आहेत. त्याच्या बिघडलेल्या तंत्राचा प्रतिस्पर्धी फलंदाजांनी पुरेपुर फायदा घेतला आहे.

दरम्यान, मोहम्मद सिराजचा सहकारी खेळाडू असलेल्या वनिंदू हसरंगाही याबाबतीत मागे नाही. हसरंगाच्या गोलंदाजीवर या आयपीएल हंगामात २८ षटकार बसले आहे. मात्र, हसरंगाच्या नावे २५ बळी असल्याने त्याच्यावर कमी टीका होत आहे. याशिवाय, आरसीबीचा माजी खेळाडू असलेल्या युझवेंद्र चहलने सुद्धा २०१५ च्या आयपीएल हंगामामध्ये फलंदाजांना २८ षटकारांची भेट दिली होती.