रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये ६ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने १९६ सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला आहे. यात ५ शतकं आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ५१ धावा केल्यानंतर त्याच्या नावावर हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत १९६ सामन्यात ६ हजार २१ धावा केल्या आहेत. कोहलीने ३८.३५ च्या सरासरीने आणि १३०.६९ स्ट्राइक रेटने हे लक्ष्य गाठलं आहे.
Milestone
6000 Runs in #VIVOIPL for Kohli
Live – https://t.co/dch5R4juzp #RCBvRR #VIVOIPL pic.twitter.com/WxLODwE2zD
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १९७ सामन्यात ३३.२१ च्या सरासरीने ५ हजार ४४८ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वात आधी ५ हजारांचा टप्पा गाठला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिखर धवन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १८० सामन्यात ३५.०१ च्या सरासरीने ५ हजार ४२८ धावा केल्या आहेत. तर सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १४६ सामन्यात ५ हजार ३८४ धावा केल्या आहेत. मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने २०४ सामन्यात ३१.३९च्या सरासरीने ५ हजार ३६८ धावा केल्या आहेत.
IPL 2021: विराटसेनेची विजयी घोडदौड कायम; राजस्थानला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थानी
टी २० सामन्यात तीन खेळाडुंनी आतापर्यंत १० हजारांचा पल्ला गाठला आहे. यात वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर आहे. त्याने १३ हजार ७९६ धावा केल्या आहेत. त्यात २२ शतकं आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर कायरन पोलार्ड या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १० हजार ६७८ धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. डेविड वॉर्नरही या यादीत लवकरच जाईल असं दिसतंय. त्याच्या ९ हजार ९५४ धावा आहेत. त्याला केवळ ४६ धावांची आवश्यकता आहे.