आयपीएल २०२१मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अजून एक विजय मिळवत प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. आरसीबीने बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावलेल्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरुने १७.१ षटकातच ३ गडी गमावून हा सामना खिशात टाकला. या विजयानंतर विराटने सामन्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगाविषयी सांगितले आहे.

विराट कोहली म्हणाला, ”आम्ही मागील दोन सामन्यांमध्ये गोलंदाजीत कमबॅक केले आहे, जे एक चांगले लक्षण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये, जर तुम्ही अशी गोलंदाजी करत असाल, तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आम्ही कमबॅक करत आहोत आणि वर्चस्व गाजवत आहोत. विकेट फलंदाजीसाठी चांगली होती, १७५ धावा स्पर्धात्मक असू शकल्या असत्या. आमच्याकडे ज्या प्रकारचे गोलंदाजीचे आक्रमण आहे, आम्हाला काही विकेट्स घ्याव्या लागल्या त्यामुळे गोष्टी सुरळित झाल्या.”

”आम्हाला माहीत होते, की जर आपण संयम ठेवला तर फलंदाजांकडून चुका होतील आणि ते घडले. एविन लुईसची विकेट हा खेळ बदलणारा क्षण होता. गार्टनने त्याच्या पहिल्या गेममध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली, योग्य क्षेत्रामध्ये बॉल पिच करण्यासाठी पुरेशी तयारी केली. आम्हाला त्याची परतफेड मिळाली आहे, कारण आम्ही आत्मविश्वासू आणि निर्भयी आहोत. गेल्या दोन सामन्यांमध्ये हा आमच्या संघाचा यूएसपी होता”, असे विराटने सांगितले.

हेही वाचा – IPL 2021 : हर्षदनं हॅट्ट्रिक घेत विराटला केली दुखापत; मोहम्मद सिराजच्याही पायावर पाय देत…

या सामन्यात राजस्थानच्या मधल्या फळीकडूम सुमार दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. वरच्या फळीतील काही फलंदाजांनी धावा केल्या पण मधल्या फळीने सपशेल निराशा केली. आरसीबीने मधल्या षटकांत शानदार पुनरागमन करत रॉयल्स संघाला कमी धावसंख्येवर रोखले. राजस्थानकडून एविन लुईसने अर्धशतक झळकावले.