आरं काय मर्दा, कसं खेळायलास?? हे शब्द कोणाच्याही कानावर पडले तरीही तो लगेच ओळखेल की मी कोल्हापुरात आलोय. गेली अनेक वर्षे कोल्हापूर शहर हे रांगडी बोली, तांबडा-पांढरा रस्सा, कुस्ती या गोष्टींसाठी आपली ओळख बनवून आहे. कुस्ती आणि कोल्हापूर हे गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य महाराष्ट्रीय माणसासाठी बनलेलं समीकरण होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते लग्न झालेल्या एखाद्या तरुणापर्यंत सर्व मंडळी तालमीच्या मातीत आपली पाठ लोळवताना दिसायची. मात्र काळानुरुप या समीकरणांमध्ये आता बदल व्हायला लागले आहेत. कोल्हापुरातली सध्याची तरुण पिढी ही फुटबॉलच्या मैदानावर रमायला लागली आहे.

फुटबॉल आणि कोल्हापूर यांचं नात हे तसं फार जुनं. १९३० पासून कोल्हापुरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी या शहरात फुटबॉल खेळाची बीज रोवली. आज ८७ वर्षांच्या कालावधीनंतर कोल्हापुरात फुटबॉलचे तब्बल १२५ संघ असून, या संघांद्वारे २५०० हजार खेळाडू मैदानात आपलं भविष्य आजमवत असतात. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधलं पोलो मैदान, शाहू मैदान हे या तरुण खेळाडूंसाठी आता हक्काचं घर बनून गेलं आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

मुडशिंगे गावचा आठवीत शिकणारा शार्दुल कुरणे आणि लक्ष्मी कॉलनीतला सातवीत शिरणारा अनिरुद्ध सुतार हे पोलो मैदानात होणाऱ्या आपल्या फुटबॉलच्या उपांत्य सामन्यासाठी तयार होत होते. लहान वयातही या मुलांच्या डोळ्यासमोरची ध्येय ही पक्की दिसत होती. त्यांना अनिकेत जाधव प्रमाणे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. अनिकेत हा आगामी फिफा विश्वचषकात सहभागी होणारा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू ठरला आहे. कोल्हापुरच्या मातीतल्या खेळाडूने एवढी मोठी मजल मारल्यामुळे स्थानिक सामन्यांमध्येही त्याच्या अभिनंदनाचे पोस्टर लागलेले पाहायला मिळतात.

 

Kolhapur Sports Association ही जिल्ह्यातली फुटबॉलपटूंचं पालकत्व स्वीकारलेली एकमेव संस्था. छत्रपती शाहू महाराज आणि खासदार संभाजी राजे, मालोजीराजे यांच्या घराण्याकडे सध्या या संस्थेची सूत्रे आहेत. त्यामुळे शहरात फुटबॉलचा प्रसार होण्यास महत्त्वाचा हातभार लाभतो, असं कोल्हापूर शहरातले क्रीडा जाणकार सांगतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या शासकीय मदतीशिवाय ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या फुटबॉलपटूंचा सांभाळ करतेय. प्रत्येक खेळाडूला आर्थिक पाठबळासह, साधनसामग्री पुरवण्याचं महत्वाचं काम ही संस्था करतेय. जिल्हा स्तरावर खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांनाही थेट २५ हजार रुपयांपर्यंत रोख रकमेचं इनाम देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

कोल्हापूरचं छत्रपतींचं घराणं हे मुळातच क्रीडाप्रेमी. त्यातच शाहू महाराजांना फुटबॉल खेळाची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी या संघटनेची स्थापना केली. पाश्चिमात्य देशांप्रमाणे कोल्हापुरातही फुटबॉलची क्लब संस्कृती आहे. राजारामपुरी, शाहु मिल, बागलचौक, बारा ईमाम, शाहुपरी यासारखे काही जुने क्लब आज कोल्हापुरात कार्यरत आहेत. या क्लबच्या स्थानिक पातळीवर होणाऱ्या सामन्यांना कोल्हापुरचं शाहु मैदान प्रेक्षकांनी तुडूंब भरतं. कित्येकवेळा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोजकांना पोलिसांची मदत घ्यावी लागते.

पुढच्या महिन्यात भारतात १७ वर्षांखालील मुलांचा फुटबॉल विश्वचषक पार पडतोय. यासाठी राज्याच्या क्रीडा आणि शिक्षण विभागाने ‘मिशन वन मिलियन फुटबॉल’ हा उपक्रम राबवला होता. काही ठराविक अपवाद वगळता या उपक्रमाला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र राज्यात इतरत्र हा उपक्रम फक्त फोटोसेशन म्हणून राबवला गेल्याचं समोर आलं. त्यामुळे शासन राज्यात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी खरचं प्रयत्नशील आहे का?, अशी शंका घ्यायला वाव निर्माण होतो. एखाद्या खेळाचा राज्यात विकास व्हावा, यासाठी राज्य-शासनाने विशेष प्रयत्न करणं गरजेचं असतं. पण मुंबई-पुणे आणि कोल्हापूरचा अपवाद वगळता राज्यातील फुटबॉलची अवस्था ही सर्वश्रुत आहे. मात्र कोल्हापुर शहर आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही जोपासतं आहे. शहरातली ‘पेठ’ संस्कृती ही खेळाडूंमधले अधिकाधिक गुण विकसित करत आहे. मंगळवार पेठ, बुधवार पेठ यासारख्या भागांमध्ये राहणारे खेळाडू हे शाळांमधून घरी परतले की थेट फुटबॉलचं मैदानच गाठतात. कधीकाळी कोल्हापुरातल्या मुलांमध्ये कुस्तीसाठी ही ओढ होती. आज प्रत्येक मुलगा फुटबॉलमध्ये आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या शहरातील खेळाडूंबद्दल माहिती देताना, संघटनेचे फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान स्पष्टपणे जाणवत होता.

मुलांप्रमाणेच कोल्हापुरात मुलींचेही स्वतंत्र संघ आहेत. स्थानिक पातळीवर सामन्यांमध्ये खेळताना त्यांच्यातले गुण, फुटबॉलची समज ही प्रकर्षाने जाणवते. एखाद्या पुरुष खेळाडूला मागे टाकतील असा खेळ सध्या कोल्हापूरच्या रणरागिणी करतायत.

गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरातल्या काही शाळांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने फुटबॉलच्या मैदानात झोकून दिलंय, त्याला खरंच तोड नाही. यापैकी महाराष्ट्र विद्यालय नावाची शाळा गेली ४३ वर्षे सतत १९ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावते आहे. प्रशिक्षक प्रदीप साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा महाराष्ट्र विद्यालयाचा संघ स्थानिक स्पर्धांमध्ये आपली छाप सोडतोय. तर भाई माधवराव बागल विद्यालयाचे शिक्षकही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करुन खेळाडूंना फुटबॉल शिकवण्याचं काम करतायत.

गेली अनेक वर्षे सरकारच्या मदतीशिवाय कोल्हापुरकरांनी फुटबॉलला वाढवलं, मोठं केलं. आज अनिकेत जाधवच्या रुपाने त्याचं फळ दिसायला लागलंय. कोणताही खेळ मोठा करायचा तर त्यासाठी अपार मेहनत लागते हे कोल्हापुरकरांनी सिद्ध करुन दाखवलंय. सध्या कोल्हापूरचे ३ खेळाडू हे डेम्पो, मोहन बागानसारख्या क्लबकडून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत आहेत. हा आकडा पुढच्या काही वर्षांमध्ये वाढावा यासाठी कोल्हापुरची जाणती मंडळी सतत प्रयत्न घेतायत. त्यामुळे निव्वळ एक दिवसासाठी फोटोसेशन करण्यापुरता ‘वन मिलीयन फुटबॉल’ उपक्रम राबवण्यापेक्षा सरकारचा क्रीडा विभाग कोल्हापुरकरांच्या उदाहरणातून काही धडा घेईल ही आशा.