यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी भारतीयांच्या चांगलीच जिव्हारी लागली. एकही सामना न गमावता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला, या सामन्यात संथ फलंदाजी करणारा डावखुरा फलंदाज युवराज सिंग टीकेचा धनी ठरत होता. त्यानंतर थेट गुरुवारी युवराजने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अंतिम फेरी कधीही विसरता येऊ शकत नाही, पण जे झाले ते विसरून आता नवीन आव्हान स्वीकारायला हवे, असे युवराजने सांगितले.
‘‘अंतिम फेरीच्या आठवणी कायम मनात घर करून राहतात. पण एक खेळाडू म्हणून या भावना विसरून त्यामधून लवकर बाहेर यायला हवे आणि नवीन आव्हान स्वीकारायला हवे,’’ असे युवराज म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘एक संघ म्हणून विश्वचषकात आमची कामगिरी जबरदस्त झाली. पण अंतिम फेरीत आखलेल्या रणनीतीनुसार काहीही करू शकलो नाही. या निराशेमधून बाहेर पडणे नक्कीच सोपे नसते. या वेळी यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना योग्य पद्धतीने हाताळायला हवे असते.’’
आयपीएलबाबत युवराज म्हणाला की, ‘‘आमच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चांगला सराव केला असून यामध्ये रणनीती ठरवण्याचे कामही केले आहे. ख्रिस गेल, अ‍ॅलन डोनाल्ड, डॅनियल व्हिटोरी आणि ए बी डी’व्हिलियर्ससारख्या खेळाडूंबरोबर एकत्रित राहणे, हे माझे सौभाग्य आहे.’’