रेड कार्ड मिळाल्यामुळे डच्चू मिळालेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बॅलेने रिअल माद्रिदला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत व्हिलारिअलवर विजय मिळवून दिला. अन्य लढतीत अल्मेरिआने अ‍ॅटलेटिको माद्रिदचा २-० असा धुव्वा उडवला.
चेचू डोराडोच्या हातून झालेल्या चुकीचा फायदा उठवत बॅलेने रिअलसाठी सलामीचा गोल केला. त्यानंतर काही मिनिटातच त्याने दिलेल्या अचूक पासवर करीम बेन्झामाने गोल केला. मध्यंतरापूर्वी मारिओ गॅस्परने शानदार गोल करत व्हिलारिअलचे खाते उघडले. मात्र चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रिअलच्या जेस रॉड्रिग्जने शिताफीने गोल करत रिअलची आघाडी बळकट केली. व्हिलारिअलच्या जिओव्हानी डोस सँटोसने फ्री किकच्या माध्यमातून गोल करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. करीम बेन्झामाने आणखी एक गोल झळकावत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गोल करण्याच्या बाबतीत रिअल माद्रिदने गुणतालिकेत अ‍ॅटलेटिकोला मागे टाकले.
अन्य लढतीत अ‍ॅटलेटिको संघाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. अ‍ॅटलेटिकोचा नियमित गोलरक्षक थिबोट कौरटिअस दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत डॅनियल अरानझुबिआकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली मात्र त्याच्या सुमार प्रदर्शनाचा फटका अ‍ॅटलेटिको संघाला बसला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिल्याने गोल करण्याच्या संधी कमी होत्या. ८०व्या मिनिटाला अल्मेरियातर्फे वेरझाने सलामीचा गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांनी वेरझाने पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने गोल केला. उर्वरित वेळात अ‍ॅटलेटिकोलाही गोल करण्याची कोणतीही संधी न देत अल्मेरियाने विजय मिळवला.