न्यूझीलंड मजबूत स्थितीत
दुबई : सांघिक प्रयत्नांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ४०३ धावांची मजल मारली. टीम लॅथमने सर्वाधिक १३७ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी योगदान दिल्याने न्यूझीलंडला चारशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या २ बाद ३४ धावा झाल्या आहेत. अझर अली ४ तर युनुस खान १ धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानचा संघ अजूनही ३६९ धावांनी पिछाडीवर आहे.

बॅडमिंटन : अजय मुख्य फेरीत
हाँगकाँग : अजय जयरामने हाँगकाँग सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत आगेकूच केली. पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत अजयने पहिल्या लढतीत मलेशियाच्या मोहम्मद अरिफ अब्दुल लतीफवर २१-१२, २२-२० असा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत अजयने तैपेईच्या शिह कुइे चुनला २३-२१, २१-७ असे नमवले. सौरभ वर्मा एकेरीत तर मलेशियाच्या व्हाँटूस इंद्र मवानच्या साथीने खेळणाऱ्या प्राजक्ता सावंत यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

अमन, मधुरिका अजिंक्य
पुणे : बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेत अमन बालगू व मधुरिका पाटकर यांनी जेतेपदावर नाव कोरले. अजिंक्यपद मिळविले. पुरुष गटात अमनने सिद्धेश पांडेवर १६-१४, ११-८, ११-८, ११-७ अशी मात केली. महिलांमध्ये मधुरिकाने दिव्या देशपांडेवर ११-३, ६-११, ११-५, ९-११, ३-११, ११-८, ११-६ असा विजय मिळवला. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात सानिश आंबेकर याने नागपूरच्या देवदत्त फडणवीसला ११-६, १३-१५, १०-१२, ११-३, ११-९, ११-४ असे नमवले. मुलींमध्ये चार्वी कावळेने सेनहोरा डिसुझाचा  ११-८, ११-९, ११-८, ११-७ असा पराभव केला.  कुमार मुलांच्या गटांत सिद्धेश पांडे विजेता ठरला तर मुलींमध्ये पायल बोरा हिला विजेतेपद मिळाले.

क्रिकेट : टीसीएसची आगेकूच
मुंबई : कॅपिटल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमईटी, टीसीएस संघांनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. जयंत सातधरेच्या ६१ धावांच्या जोरावर एमईटीने १५० धावांची मजल मारली. अ‍ॅक्सिस बँकेचा डाव ७१ धावांतच गडगडला. रोशन जैस्वालने सर्वाधिक ३ बळी घेतले. अभ्युदय बँकेने १०९ धावा केल्या. पिंकेश तांडेलने ३ बळी घेतले. टीसीएसने ३ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. कोटक महिंद्राने ११४ धावा केल्या. मल्टीस्क्रीन मीडियाने प्रतीक पाटीलच्या ५२ धावांच्या बळावर हे लक्ष्य पूर्ण केले. बेस्टने युनायटेड इंडिया इन्शुरन्सला ६८ धावांतच रोखले. बेस्टने अजय मुनीच्या ३१ धावांच्या  जोरावर हे लक्ष्य गाठले.

फुटबॉल : सेंट अ‍ॅन विजयी
मुंबई : एमएसएसए-मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित वार्षिक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट अ‍ॅन, मालाड आणि डॉन बॉस्को, माटुंगा संघांनी विजयी आगेकूच केली. १४ वर्षांखालील मुलांच्या लढतीत सेंट अ‍ॅनने सेंट झेव्हियर बॉइज अकादमी संघावर ३-० असा विजय मिळवला. अ‍ॅन संघातर्फे रेमंड जॉनने २ गोल केले. डॉन बॉस्को संघाने सेंट लॉरेन्स संघावर ३-० अशी मात केली. कुश संपतने २ गोल केले.

केंकरे एफसीची आगेकूच
मुंबई : मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगच्या सुपर डिव्हिजनच्या लढतीत केंकरे एफसीच्या १९ वर्षांखालील संघाने बृहन्मुंबई पोलिस संघावर १-० अशी मात केली. केंकरे संघातर्फे मेलरोय मस्करेन्हसने एकमेव गोल केला. इंडियन कल्चरल लीग अ संघाने खालसा जिमखाना संघावर ३-१ असा विजय मिळवला. वरिष्ठ गटाच्या लढतीत भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) संघाने मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाला ४-२ असे नमवले.