भारताचा पुरुष संघ फिफा विश्वचषकात कधी खेळेल, हे सांगता येणे कठीण आहे. पण महिला फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीत पुरुषांपेक्षा सरस आहे. पुरुषांमध्ये फिफा विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी बरीच चढाओढ असली तरी भारताचा महिला संघ मात्र भविष्यात नक्कीच फिफा विश्वचषकात खेळेल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.
ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने शनिवारी २०२०च्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूवर ‘लेझर शो’द्वारे साकारलेला बोधचिन्हाचा नयनरम्य सोहळा सर्वाची वाहवा मिळवून गेला.
‘‘१९५०च्या दशकात पात्र ठरूनही भारतीय संघाला फिफा विश्वचषकात खेळता आले नव्हते. १३० कोटी लोकसंख्या असलेला आपला देश मग आता फिफा विश्वचषकासाठी का पात्र ठरू शकत नाही? जगात फुटबॉल हा खेळ पहिल्या क्रमांकावर आहे, मग भारतात का नाही? कोणत्याही मोसमात, कोणत्याही वातावरणात, कुणीही फुटबॉल हा खेळ खेळू शकतो. मग आपण मागे का पडत आहोत, याची कारणे शोधायला हवीत. फुटबॉल हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताचा महिला संघ पहिल्यांदाच उतरत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. या वेळी ‘फिफा’च्या महिला फुटबॉलच्या प्रमुख सराय बेअरमन तसेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिलांची फुटबॉल लीग लवकरच
क्रीडा मंत्रालयातर्फे लवकरच देशात महिलांची फुटबॉल लीग आयोजित केली जाणार आहे. पुढील महिन्यात त्याविषयीची घोषणा केली जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि एआयएफएफ यांच्याशी बोलणी करून लवकरच या स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप आणि बोधचिन्ह जाहीर करण्यात येईल. फुटबॉल हा खेळ एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
भारतीय फुटबॉलचे नवे पर्व सुरू -पटेल
२०१७ची १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा तुफान यशस्वी ठरल्यानंतर आता पुढील वर्षी १७ वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याचे आमचे ध्येय आहे. माझ्या १० वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत भारतात दुसऱ्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत आहे. पुढील १० वर्षांत जगातील फुटबॉलमध्ये भारताचेही नाव मोठय़ा आदराने घेतले जाईल. भारतीय फुटबॉलचे नवे पर्व सुरू झाले असून २०२६च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत भारताचा तिरंगा नक्कीच झळकेल, अशी आशा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
