प्रशिक्षक जगमल सिंग यांचा विश्वास
नरसिंगबद्दल बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या आहेत. या वाईट गोष्टींचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आयुष्यात चढ-उतार येत असतात, बरे-वाईट दिवस येतात. दु:खाशिवाय सुखाची चव कळत नाही. अडचणींची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून नरसिंग ऑलिम्पिकला जात आहे. या प्रकरणानंतर नव्या उमेदीसह उभारी घेऊन, नरसिंग पदक भरारी नक्की घेईल, असा विश्वास नरसिंगचे प्रशिक्षक जगमल सिंग यांनी व्यक्त केला.
आता ऑलिम्पिकला फारच कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. सुशील कुमारची न्यायालयीन धाव, उत्तेजक चाचणी या प्रकरणांमुळे नरसिंगचे मानसिक खच्चीकरण झाले असेल. त्याला ऑलिम्पिकसाठी मानसिकरीत्या कसे सक्षम बनवणार आहात, या प्रश्नावर जगमल सिंग म्हणाले की, ‘‘मी बऱ्याच वर्षांपासून नरसिंगला ओळखतो. तो कोणतीही गोष्ट सहजासहजी सोडत नाही. एखाद्यावेळेस मी एखादी गोष्ट सोडण्याचा विचार करेन. पण़़, त्याचा इच्छाशक्ती फारच प्रबळ आहे. या प्रकरणानंतर त्याला नक्की नवी उमेद मिळेल. तो पेटून उठेल. पण, आखाडय़ात तो शांत राहील. याकरिता त्याने मनातील नकारात्मक गोष्टी बाहेर फेकून द्यायला हव्यात. आता सारे काही वाईट निघून गेले आहे. पुन्हा चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल.’’
या सर्व प्रकरणांमुळे नरसिंगच्या सरावावर फरक पडला असेल, तर कमी दिवसांमध्ये त्याच्याकडून तसा सराव करून घ्याल, यावर ते म्हणाले की, ‘‘नरसिंगच्या सरावामध्ये काही प्रमाणात बाधा निर्माण झाली होती. पण, तो कधीच खचत नाही. आता नव्या उमेदीने तो सराव करेल. ऑलिम्पिकमधल्या त्याच्या प्रतिस्पध्र्याचा मी बऱ्याच महिन्यांपूर्वी अभ्यास करून ठेवला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या बऱ्याच प्रतिस्पध्र्याना नरसिंगने नमवले आहे. आता ऑलिम्पिक पदकाचे ध्येय असून त्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. आजचा दिवस माझ्यासाठी सोनेरी दिवस आहे.