ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडुंचे प्रदर्शन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारत लंडन ऑलिम्पिकमधील यशाची पुनरावृत्ती करणार का, पदतालिकेत तळाच्या स्थानाला राहणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला किमान १० पदके मिळतील, अशा विश्वास भारतीय ऑलिम्पिक संघटनेने व्यक्त केला होता. मात्र, पहिल्या तीन दिवसांत भारताच्या पदकांची पाटी कोरीच आहे. त्यात काल झालेल्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग या दोघांनाही पदक मिळविण्यात अपयश आले. या दोन्ही अनुभवी खेळाडुंकडून भारताला पदकाच्या प्रचंड आशा होत्या. त्यामुळे आता भारताची मदार अन्य खेळाडुंवर आहे. यामध्ये मंगळवारी होणाऱ्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीना सिंधूंच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, बॉक्सिंग, कुस्ती आणि बॅडमिंटन या स्पर्धा अजून सुरू व्हायच्या आहेत. तसेच ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जितू रायकडून पदकाच्या अपेक्षा कायम आहेत. नेमबाजी खालोखाल भारताला कुस्तीमध्ये पदकाच्या खूप अपेक्षा आहेत. नरसिंग यादव आणि योगेश्वर दत्त भारतासाठी नक्कीच पदक मिळवतील अशी अनेकांना खात्री आहे.
भारतीय खेळाडू फक्त सेल्फी काढायला रिओला गेलेत- शोभा डे
बॅडमिंटनमध्ये लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक मिळवणाऱ्या सायना नेहवाल हिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. याशिवाय, पी. व्ही. सिंधू हिची आजवरची कारकीर्द पाहता आश्चर्यजनक निकाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर बॉक्सिंमध्ये विकास कृष्णन, शिवा थापा आणि मनोज कुमार या त्रिकुटाकडूनही भारताला पदकाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
भारतीय हॉकी टीमला काल जर्मनीकडून पराभव स्विकारावा लागला असला तरी भारत उपांत्य फेरीचा अडथळा पार करेल, अशी आशा आहे. त्यानंतर शांत डोक्याने आणि सर्वोत्तम खेळ केल्यास भारतीय संघाला पदक मिळायला हरकत नाही. याशिवाय, टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीकडून भारताला पदकाच्या खूप अपेक्षा आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतून अनेक दिग्गज खेळाडुंनी माघार घेतल्यामुळे टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात ही जोडी पदक मिळविण्यात यश ठरेल, अशी आशा आहे. तेव्हा आता भारताच्या पदकांची कोंडी कधी फुटणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कदाचित एक पदक मिळाल्यानंतर इतर भारतीय खेळाडुंचे मनोधैर्य उंचावेल आणि भारत लंडन ऑलिम्पिकमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा बाळगुया.
रायफल तुटल्यामुळे अभिनव बिंद्राचा नेम थोडक्यात चुकला!