Rishabh Pant On Team India Playing XI: हेडिंग्लेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याच्या ४८ तासांआधीच इंग्लंडने आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे. भारतीय संघाने अद्यापही आपली प्लेइंग ११ जाहीर केलेली नाही. मात्र, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने पहिल्या कसोटीसाठी फलंदाजीक्रम कसा असेल, याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
या दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार म्हणून शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. मात्र, फलंदाजीत या दोघांची जागा कोण घेणार, हे अद्यापही स्पष्ट झालं नव्हतं. रोहित शर्माच्या जागी केएल राहुल सलामीला फलंदाजी करताना दिसेल. तर विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर शुबमन गिल फलंदाजी करणार असल्याची माहिती ऋषभ पंतने दिली आहे.
सामन्याच्या दोन दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ऋषभ पंतने फलंदाजी क्रमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. पंत म्हणाला, “मला माहित आहे, आता अशीच चर्चा सुरू असेल की तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार. पण चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार, हे स्पष्ट झालं आहे. मला वाटतं शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि मी पाचव्या क्रमांकावर खेळणार, यावर चर्चा सुरूच राहिल.”
तसेच शुबमन गिलबाबत बोलताना पंत म्हणाला, “मैदानाबाहेर माझं आणि गिलचं नातं खूप चांगलं आहे. मला आधीपासून असं वाटतं, जर मैदानाबाहेर मैत्री चांगली असेल, तर मैदानावरही ते नातं चांगलं टिकून राहतं.” शुबमन गिल आणि ऋषभ पंत पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी गिलकडे सोपवली गेली आहे. तर त्याला साथ देण्यासाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे.