Rishabh Pant Wicket: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चौथ्या दिवसाच्या शेवटी फलंदाजीला यावं लागलं. चौथ्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना आकाशदीप नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला. गिल बाद झाल्यानंतर ऋषभने फलंदाजीला यायला हवं होतं. पण आकाशदीप फलंदाजी करण्यासाठी आला. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने, ऋषभ पंतला शेवटच्या क्षणी फलंदाजी करायला का आवडत नाही, याबाबत खुलासा केला आहे.
आकाशदीप ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी तो फलंदाजीसाठी पूर्णपणे तयार नव्हता. हे आकाशदीप ज्या पद्धतीने मैदानात आला, त्यावरून स्पष्ट दिसत होतं. तो मैदानात आल्यानंतर आर्म गार्ड आणि ग्लोव्हज ठीक करत होता. कारण त्याला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय हा शेवटच्या क्षणी घेण्यात आला. आर अश्विनने ऋषभ पंतचा मीरपूर कसोटीतील एक किस्सा सांगितला. भारतीय संघ १४० धावांचा पाठलाग करत होता. वातावरण दमट होतं. त्यामुळे सर्व विश्रांती करत होते. सुरूवातीचे २ फलंदाज बाद झाल्यानंतर दिवसाचा खेळ संपायला ३० ते ४० मिनिटांचा वेळ शिल्लक होता. त्यावेळी ऋषभ पंतने फलंदाजीला जाण्यास नकार दिला होता.त्यामुळे आधी अक्षर पटेलला आणि नंतर जयदेव उनाडकटला नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला पाठवावं लागलं होतं. अश्विनला हेच सांगायचं होतं की, ऋषभला शेवटचे ३०-४० मिनिटे शिल्लक असतील, तर फलंदाजीला जायला आवडत नाही. त्यामुळे आकाशदीप फलंदाजीला आला असावा.
जोफ्रा आर्चरच्या रॉकेट बॉलवर ऋषभ पंत बाद
या सामन्यात ऋषभ पंतच्या तर्जनीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात येऊ शकला नव्हता. मात्र संघ अडचणीत असताना तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. पाचव्या दिवशी सकाळी फलंदाजी करत असताना त्याने चौकार मारून भारताला चांगली सुरूवात करून दिली. पण जोफ्रा आर्चरने टाकलेला आत येणारा चेंडू हा ऋषभ पंतची दांडी गुल करून गेला. त्यामुळे भारताचा निम्मा संघ तंबूत परतला.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला ऋषभ पंत आणि केएल राहुलची जोडी मैदानावर आली. दोघांकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनीही भेदक मारा केला. इंग्लंडकडून २१ वे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला.या षटकात पाचवा चेंडू जोफ्रा आर्चरने राऊंड द विकेटने टाकला. जो टप्पा पडताच अँगलने वेगाने आत आला आणि ऋषभ पंतची दांडी गुल करून गेला. त्यामुळे ऋषभ पंतला ९ धावांवर माघारी परतावं लागलं आहे.