काही दिवसांपूर्वी रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत विदर्भाकडून हार पत्करावी लागल्यानंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशनने आगामी स्पर्धांसाठी संघाच्या नेतृत्वात बदल करण्याचं ठरवलं आहे. गेलं वर्षभर फॉर्मशी झगडणाऱ्या ऋषभ पंतला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऋषभऐवजी प्रदीप सांगवान सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत दिल्लीचं नेतृत्व करणार आहे.

२०१७ सालात विजय हजारे करंडक स्पर्धेपासून ऋषभ पंतकडे दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं होतं. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर आल्यानंतर ऋषभच्या फलंदाजीचा फॉर्म घसरला होता. रणजी करंडक स्पर्धेत पंत अवघ्या ३१५ धावा काढू शकला.

“रणजी सामन्यादरम्यान ऋषभला कर्णधारपदाचा भार होत असल्याचं आम्हाला जाणवलं. कर्णधारपदाची जबाबदारी तो योग्य पद्धतीने हाताळत नव्हता. कदाचीत याच कारणामुळे यंदाच्या हंगामात तो धावा करु शकला नाही. त्यामुळे टी-२० स्पर्धेत त्याच्यावरचा हा भार कमी करणं आम्हाला योग्य वाटलं. टी-२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत आक्रमक फलंदाजी करतो. त्यामुळे प्रशिक्षक के. पी. भास्कर यांच्याशी चर्चा करुन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं”, दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष अतुल वासन यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.