BCCI Announced India Updated Squad for IND vs ENG 5th test: मँचेस्टर कसोटीनंतर भारतीय संघाने पाचव्या कसोटीसाठी सुधारित संघ जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. मँचेस्टर कसोटीत फलंदाजी करताना पंतच्या पायाला दुखापत झाल्याने फ्रॅक्चर झालं होतं. गौतम गंभीरने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ऋषभ पंत मालिकेबाहेर पडल्याचं सांगितलं आणि बीसीसीआयने देखील अपडेट दिले आहेत.

मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऋषभ पंतला दुखापत झाली. मात्र, दुसऱ्या दिवशी तो मोठ्या जिद्दीने फलंदाजीसाठी आला, त्याने अर्धशतकही झळकावलं. पण आता पंत अखेरच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ऋषभ पंत ख्रिस वोक्सच्या चेंडूवर स्विप शॉट खेळायला गेला, पण तो अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या उजव्या पायावर जाऊन आदळला. इंग्लंडचा संघ विकेटसाठी अपील करतो, पण पंत मात्र तिथे वेदनेने कळवळत असतो. पंतला पाहताच फिजिओ मैदानावर येऊन त्याच्या पायातील मोजे काढतात आणि त्याच्या पायातून रक्त येत असत आणि सूजदेखील येते. पंत इतका वेदनेत होता की त्याला जमिनीवर पायही ठेवता येत नव्हता. त्याला कार्टमधून बाहेर नेण्यात आलं.

ऋषभ पंतच्या जागी कोणाला मिळाली संधी?

पंतला लगेच रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी पाठवलं. पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली. पायाला फ्रँक्चर असतानाही पंत फलंदाजीला उतरला, पण यष्टीरक्षणासाठी ध्रुव जुरेल उतरला होता. यानंतर आता पंत मालिकेतून बाहेर झाला आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडल्याने त्याच्या जागी बदली खेळाडूची बीसीसीआयने घोषणा केली आहे. यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशन याला संघात सामील करण्यात आलं आहे. एन जगदीशन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूचा संघाचा भाग असून त्याला टीम इंडियामध्ये प्रथमच सामील करण्यात आलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने आता पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ने पुढे आहे. भारताला जर मालिका ड्रॉ करायची असेल तर ओव्हलच्या मैदानावरील सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारताचा सुधारित संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन जगदीसन (यष्टीरक्षक).