इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीनंतर ऋषभ पंत पुन्हा फिट होऊन मैदानावर परतला आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील चार दिवसीय सामन्याचं नेतृत्त्व ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आहे. तर कर्णधार व यष्टीरक्षक ऋषभ पंत विकेटच्या मागून बोलतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
ऋषभ पंत नेहमीच त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. ऋषभ पंत यष्टीरक्षण करत असताना सातत्याने काही ना काही बोलत असतो आणि त्याचं हे बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड होऊन व्हायरल होतं. कर्णधार ऋषभ पंतने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
ऋषभ पंत सामन्यादरम्यान विकेटच्या मागून तनुष कोटियन व मानव सुतार या फिरकी जोडीला चांगली गोलंदाजीने सातत्याने करत राहण्यासाठी प्रोत्साहन देत होता. पण थेट बोलेल तो ऋषभ पंत कसला…, त्याने आपल्या वेगळ्याच अंदाजात त्या दोघांना सातत्याने योग्य लाईन लेंग्थवर गोलंदाजी करा सांगताना दिसला.
ऋषभ पंत म्हणतोय, “ऑफ साईडला जास्त फिल्डर नाहीयेत, तू त्याच लाईन लेंग्थवर गोलंदाजी करत राहा. थोडा वेळ सातत्याने स्टंपवर मारा करत राहा, खेळू दे त्याला. हाहा वैतागून जाऊ नकोस, तू गोलंदाजी करत राहा. शाब्बास, लय मिळवण्याचा प्रयत्न करा, १-२ ओव्हरमध्ये विकेट मिळेल. वैतागून जाऊ नका.” ऋषभ हे सातत्याने तनुषला बोलताना दिसत आहे.
मानव सुतार गोलंदाजी करताना पंत म्हणाला, “अरे भाई हीच लेंग्थ, आता असेच सहा बॉल टाकून दाखव.” पंत हे म्हणताच स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरकडे पाहून हसत होता.
भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. तो आता पुन्हा फिट झाला आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. त्याने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळू शकते. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ४७ कसोटी सामन्यांमध्ये ३४२७ धावा केल्या आहेत.
