Rishabh Pant, ICC Test Ranking: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचव्या सामन्याला ३१ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधी आयसीसीने कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा कर्णधार शुबमन गिल नवव्या स्थानी कायम आहे. तर पायाला फ्रॅक्चर असतानाही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या ऋषभ पंतने सातव्या स्थानी उडी घेतली आहे.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल या यादीत आठव्या स्थानी घसरला आहे. जैस्वालला या मालिकेत चांगली सुरूवात मिळाली होती. पण, काही डावात तो स्वस्तात माघारी परतला आहे. कसोटी फलंदाजांच्या १० अग्रगण्य फलंदाजांच्या यादीत ३ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. ज्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी, यशस्वी जैस्वाल आठव्या आणि शुबमन गिल नवव्या स्थानी आहे.

जो रूट अव्वल स्थानी

आधी हॅरी ब्रुक आणि जो रूट यांच्यात अव्वल स्थानी टिकून राहण्यासाठी स्पर्धा सुरू होती. पण आता जो रूटने ९०४ रेटिंग पॉईंट्ससह या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. रूटने भारतीय संघाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. मँचेस्टर कसोटीतही त्याने दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीमुळे इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारला होता. तर इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने १० अग्रगण्य फलंदाजांमध्ये १० व्या स्थानी उडी घेतली आहे. त्याने ७४३ रेटींग पॉईंट्सची कमाई केली आहे.

ऋषभ पंतची दमदार कामगिरी

इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत ऋषभ पंतने दमदार फलंदाजी केली आहे. संघाला गरज असताना त्याने शतक झळकावलं. यासह दुखापतग्रस्त असतानाही तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. दुखापतग्रस्त असतानाही त्याने मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात दमदार अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर तो वर्तमान भारतीय कसोटी संघातील सर्वोत्तम रेटींग मिळवणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत सातव्या स्थानी असलेल्या ऋषभ पंतने ७७६ रेटींग पॉईंट्सची कमाई केली आहे. तर यशस्वी जैस्वालने ७६९ आणि शुबमन गिलने ७५४ रेटींग पॉईंट्सची कमाई केली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाचा दबदबा कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने आयसीसीच्या रँकिंगमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. लागोपाठ अर्धशतकं झळकावण्यासह मँचेस्टर कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने शतक पूर्ण केलं होतं. रवींद्र जडेजा ४२२ रेटींग पॉईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे.