जागतिक स्तरावर अन्य खंडांमधील संघ डोईजड झाले की युरोपियन संघटक हॉकीच्या नियमांमध्ये व स्वरूपात बदल घडवितात, जेणेकरून हे बदल आत्मसात करताना अन्य देशांना दमछाक होईल. जागतिक स्तरावर हॉकीत जे बदलाचे वादळी वारे वाहात आहेत, त्याला सामोरे जाण्याचे आव्हान भारत आणि अन्य आशिया-ओशेनिया देशांपुढे निर्माण झाले आहे.
मातीवरील हॉकीत भारताचे ऑलिम्पिकमध्ये निर्विवाद वर्चस्व होते. भारत व अन्य आशियाई देशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अ‍ॅस्ट्रो टर्फचा उपयोग सुरू झाला. त्यात दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी अव्वल दर्जाची कामगिरी केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी निळ्या रंगांच्या कृत्रिम मैदानाचा उपयोग सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने त्यावरही आपला वरचष्मा सिद्ध केला असला तरी जर्मनी, नेदरलँड्स आदी देशांनी जागतिक स्तरावर आपल्या भावी यशाची झलक दाखविली आहे. यंदा कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने विजेतेपद राखताना वरिष्ठ गटात नजीकच्या काळात ऑस्ट्रेलियाला शह देऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. याच स्पर्धेत फ्रान्सने अंतिम फेरीत स्थान मिळविताना ‘हम भी कुछ कम नहीं’चा प्रत्यय घडवला आहे. भारतात झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सने ऐतिहासिक यश मिळविले. प्रथमच कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत अंतिम लढतीत त्यांनी स्थान मिळविले. या लढतीविषयी त्यांनी मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्यांनी जर्मनीला झुंज दिली. तथापि, निल्कास वेलेनने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर जर्मनीने फ्रान्सला ५-२ असे हरविले. नेदरलँड्सने मलेशियावर ७-२ असा सहज विजय मिळवीत तिसरे स्थान घेतले. बलाढय़ कांगारूंना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या महिलांनी जर्मनीत झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पध्रेत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर मात केली. राणी रामपॉल या भारताच्या खेळाडूने स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला.
या स्पर्धेत भारताकडून पदकाची अपेक्षा होती. त्यासाठी भारताने आपल्या संघातील खेळाडूंना वरिष्ठ गटाच्या आशियाई स्पर्धेत खेळवले होते. वरिष्ठ खेळाडूंबरोबर खेळताना अनुभव मिळाल्यानंतर ते घरच्या मैदानावरील विश्वचषक स्पर्धेत अव्वल कामगिरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र भारताचा कोणताही हॉकी संघ असला तरी त्याच चुकांची पुनरावृत्ती भारतीय खेळाडूंकडून केली जाते. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही नेमके तेच घडले. बाद फेरीसाठी कोरियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळविणे भारतासाठी अनिवार्य होते. ०-१ अशा पिछाडीवरून भारताने ३-१ अशी आघाडीही घेतली होती, मात्र उत्तरार्धात पाच मिनिटांच्या फरकाने भारताने दोन गोल स्वीकारले. त्यामुळे हा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला आणि भारताचे बाद फेरीचे स्वप्न धुळीस मिळाले. काही वेळा बरोबरी ही पराभवापेक्षा बोचरी असते असाच अनुभव भारतीय खेळाडूंच्या वाटय़ाला आला. नवव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पध्र्याकडून पराभव पत्करला. त्यामुळे पदक मिळविण्याचे स्वप्न पाहणारा भारतीय संघ दहाव्या स्थानावर फेकला गेला.
भारताने अझलन शाह चषक स्पर्धेतही निराशा केली होती. तिथे त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जमेची बाजू एकच की, हा क्रमांक मिळविताना त्यांनी पाकिस्तानला हरविले होते. अतिशय प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम लढतीत मलेशियावर मात केली. कोरियाने न्यूझीलंडला पराभूत करीत तिसरे स्थान घेतले.
सुलतान जोहर चषक स्पर्धेत भारताने अजिंक्यपद मिळविले, ही भारतासाठी यंदाची जमेची बाजू ठरली. भारतीय महिलांनी आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. या पदकामुळे भारतीय महिला हॉकीमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत जपानने कोरियावर विजय मिळवत सोनेरी यश संपादन केले. भारताने पुरुष व महिलांच्या विश्वचषक स्पर्धेची पात्रता निकष पूर्ण केल्यामुळे हॉकीला संजीवनी मिळणार आहे. याचा फायदा घेत या दोन्ही स्पर्धामध्ये सर्वोत्तम यश मिळविण्याची जबाबदारी भारतीय खेळाडूंवर आहे.
भारत हा नेहमी संयोजनात आघाडीवर असतो. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी संयोजन भारताने केल्यानंतर २०१८मध्ये होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेची जबाबदारी भारताकडे सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता अद्याप भरपूर कालावधी आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी भारताने आतापासूनच संघबांधणी करण्याची आवश्यकता आहे. पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. २०१६च्या ऑलिम्पिकपूर्वी आपल्या कामगिरीची चाचपणी करण्याची भारताला चांगली संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा ध्यास आपण ठेवला पाहिजे आणि त्यादृष्टीनेच सरावावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
भारतीय हॉकीची सूत्रे सध्या ऑस्ट्रेलियाकडून चालविली जातात की काय, अशी शंका येते. भारतीय हॉकी संघासाठी कामगिरी सुधारणा संचालक म्हणून रोलॅन्ट ओल्टमन्स काम करीत आहेत. आता मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे टेरी वॉल्श या आणखी एका ‘ऑसी’ प्रशिक्षकाकडे दिली आहेत. प्रशिक्षकपदी परदेशी खेळाडू किंवा अन्य कोणीही आले तरी भारतीय खेळाडूंच्या मूळ स्वभावात फरक पडत नाही हेच निर्विवाद सत्य आहे. पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अचूकतेचा अभाव आणि सांघिक खेळाऐवजी वैयक्तिक कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न या मूळच्या चुका दुरुस्त केल्या जात नाही, तोवर कोणताही प्रशिक्षक भारतीय संघाला उच्च श्रेणीपर्यंत नेऊ शकणार नाही. जागतिक स्तरावरील स्पर्धेत परदेशी खेळाडू आपल्या शैलीत व तंत्रात कसा बदल घडवत आहेत, याचा भारतीय खेळाडूंनी बारकाईने अभ्यास केला आणि आपल्या कामगिरीत सुधारणा केली तरच आगामी वर्षांत भारतीय हॉकीपटू दिमाखदार यश मिळवू शकतील.