मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत होणार असून यात अध्यक्षपदासाठी रॉजर बिन्नींच्या नावाची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा करायचा का, हा सर्वसाधारण सभेतील चर्चेचा मुख्य विषय असेल.

‘बीसीसीआय’ची निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे. पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड होणार असून, त्यांच्या घोषणेची केवळ औपचारिकताच सभेत पार पाडली जाईल. परंतु, ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा करायचा की विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना पाठिंबा दर्शवायचा, हा प्रश्न अजून अनुत्तरीत असल्यामुळे या मुद्दय़ावर सभेत प्रामुख्याने चर्चा होईल. ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यास २० ऑक्टोबपर्यंतची मुदत आहे. ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळाची बैठक ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान मेलबर्न येथे होणार आहे.

सौरव गांगुली सलग दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद भूषवण्यासाठी इच्छुक असतानाही त्याला पद सोडावे लागल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेला राजकीय वळणदेखील मिळाले. या सगळय़ा पार्श्वभूमीवर ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी गांगुलीला ‘बीसीसीआय’कडून पाठिंबा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी ‘बीसीसीआय’ अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या नावांचीही चर्चा आहे. श्रीनिवासन या पदासाठी पात्रही ठरतात. मात्र, श्रीनिवास यांचे वय ७८ वर्षे असून त्यांच्या उमेदवारीला ‘बीसीसीआय’कडून पाठिंबा मिळण्याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे ‘आयसीसी’च्या बैठकीच्यादरम्यान अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत व्यग्र असण्याची शक्यता आहे. याबाबतही ‘बीसीसीआय’ला विचार करावा लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आयसीसी’मध्ये ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी म्हणून जय शहा यांना पसंती मिळण्याची शक्यता असल्याने एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. शहा यांची पुन्हा ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी, राजीव शुक्ला यांनी उपाध्यक्षपदी, तर आशीष शेलार यांनी कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. क्रिकेटपटू प्रतिनिधित्वाचा निर्णय भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या निवडणुकीनंतर घेतला जाईल. ही निवडणूक २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अपेक्षित आहे.