नवीन वर्षांत जुनी भागीदारी पुनरुज्जीवित करणाऱ्या भारताच्या रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. तृतीय मानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीने उपांत्य फेरीत ल्युकास रोसोल आणि जाओ सौसा जोडीवर ६-१, ६-२ मात करीत अंतिम फेरीत आगेकूच केली. शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत या जोडीचा मुकाबला डॅनियल नेस्टर आणि नेनाद झिम्नोझिक जोडीशी होणार आहे.
पहिल्यांदा सव्‍‌र्हिस करताना बोपण्णा-कुरेशी जोडीने ६९ टक्के गुणांची कमाई करीत रोसोल-झिम्नोझिक जोडीवर वर्चस्व गाजवले. या जोडीच्या वर्चस्वामुळे सौसाने आपला राग चेंडूवर काढला मात्र याने बोपण्णा-कुरेशी जोडीची एकाग्रता भंगली नाही. केवळ ४४ मिनिटांत बोपण्णा-कुरेशी जोडीने रोसोल-सौसा जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. गेल्या वर्षी बोपण्णा आणि कुरेशी विभिन्न साथीदारांसह खेळले होते.
नवीन वर्षांत त्यांनी एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला. याआधीही एकत्र खेळताना या जोडीची कामगिरी चांगली झाली होती. अंतिम फेरीत दमदार खेळ करीत वर्षांतल्या पहिल्याच स्पर्धेत जेतेपद नावावर करण्याचा या जोडीचा प्रयत्न असणार आहे.