Rohit Sharma Break Sachin Tendulkar World Record: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. टी-२०, कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त वनडे सामने खेळत असलेल्या हिटमॅनबाबत निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. पण या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान त्याने मालिकेत सर्वाधिक २०३ धावा करत मालिकावीर ठरला आणि अखेरच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. या कामगिरीनंतर रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर, रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. रोहित शर्माने एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलला मागे टाकत जगातील नंबर वन वनडे फलंदाज ठरला आहे. यासह रोहित शर्माने वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत इतर सर्व फलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या सामन्यात रोहित ८ धावा करत बाद झाला. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ७४ धावांची खेळी केली आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १०१ च्या सरासरीने २०२ धावा केल्या. त्याच्या कामगिरीमुळे तो एकदिवसीय क्रमवारीत जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रोहित शर्माने हे स्थान मिळवलं आहे. पण पहिल्यांदाच मिळवलेल्या या स्थानासह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड
रोहित शर्माने जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनत एक विश्वविक्रम रचला आहे. तो वनडे क्रमवारीत नंबर १ स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. रोहितने ३८ वर्षे आणि १८२ दिवस वय असताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर १ रँकिंग मिळवली आहे. तर रोहित शर्माच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिन तेंडुलकर ३८ वर्षे आणि ८२ दिवस वय असताना जगातील नंबर वन वनडे फलंदाज ठरला होता. रोहितने आता सचिनचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या मोडत आपल्या नावे केला आहे.
रोहितने १८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता तो पहिल्यांदाच नंबर १ क्रिकेटपटू ठरला आहे. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर १ रँकिंग मिळवणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने यापूर्वी वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यानंतर धोनी नंबर १ फलंदाज बनला. विराट कोहली बराच काळ पहिल्या स्थानी होता. शुबमन गिलने खूप कमी वेळात एकदिवसीय क्रमवारीत पहिलं स्थान गाठलं आणि आता रोहित शर्माने हा मान मिळवला आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत २७६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,३७० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४९.२२ आहे आणि त्याने ३३ शतके आणि ५९ अर्धशतके केली आहेत. याचबरोबर वनडेमध्ये तीन द्विशतकी खेळी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
