Rohit Sharma Century IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ३३वं शतक झळकावलं आहे. सिडनीच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात हिटमॅनने हे खास शतकं झळकावलं आहे. मुंबईचा राजा रोहित शर्माचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०वं शतक आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात ८ धावा, दुसऱ्या सामन्यात ७४ धावा तर तिसऱ्या सामन्यात रोहितने थेट शतक झळकावलं आहे. रोहित शर्माने तिसऱ्या वनडेत महत्त्वपूर्ण खेळी करत आपलं शतक पूर्ण केलं आहे.
रोहित शर्माने १०५ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. रोहितने शतकी खेळी केल्यानंतर काही मोठं सेलिब्रेशन केलं नाही किंवा हेल्मेटदेखील काढलं नाही. हिटमॅनने मैदानात बॅट उंचावत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. फक्त विराट कोहलीला मिठी मारत आपल्या या शतकाचं खास सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भागीदारी या सामन्यात १२० पार पोहोचली आहे.
रोहित शर्माचं या वर्षातील हे दुसरं शतक आहे. त्याने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावलं होतं. सिडनीमध्ये केलेल्या शतकासह, रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा करणाऱ्या आणि टीकाकारांना परफेक्ट उत्तर दिलं आहे.
